जळकोट : कधी कशाला भाव येईल हे सांगता येत नाही, एकेकाळी टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. रस्त्यावर लाल चिखल दिसायचा आज मात्र याच टोमॅटोला सोन्याचा भाव आला आहे. दहा रुपये प्रति किलो मिळणारे टोमॅटो मात्र ८० रुपये किलो दराने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे .
पावसाळ्याच्या तोंडावर आठवडी बाजारामध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.सध्या शेतक-यांना वेध लागले आहे ती पेरणीचे. तसेच अनेक शेतकरी आपल्या भाजीपाल्याची शेती रिकामी करून त्या ठिकाणी इतर लागवड करण्याच्या तयारीत आहेत तर अनेक ठिकाणी पाणी कमी पडत असल्यामुळे भाजीपाला लागवड थांबली होती. यामुळे आठवडी बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक मंदावली आहे याच कारणाने भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढलेले दिसून येत आहेत .
टोमॅटो प्रति किलो ८० रुपये , भेंडी – ४० रुपये, वांगे – ४० रुपये , बटाटे – ३० रुपये, शेवगा – ८० रुपये , चवळी – ८० रुपये, गवार – ८० रुपये, कोंिथबीर -१०० रुपये, फुलकोबी – ६० रुपये, पानकोबी -६० रुपये, हिरवी मिरची – १०० रुपये या भाजीपाल्याचे भाव प्रति किलो प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत तर फोडणीसाठी आवश्यक असलेला कांदा जळकोटच्या आठवडी बाजारामध्ये प्रति किलो दहा रुपये मिळत आहे. लसुन मात्र पन्नास रुपयाला दोन किलो मिळत आहे . कांदा आणि लसणाचे भाव मात्र कमी झालेले आहेत तर पालक ची पेंडी दहा रुपये, चमकुरा दहा रुपये, शेपूची पेंढी १५ रुपये असे पालेभाज्यांचे दर आहेत.