27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरमनपाकडून गणेश विसर्जनाची जय्यत तयारी

मनपाकडून गणेश विसर्जनाची जय्यत तयारी

एकमत ऑनलाईन

लातूर : गेली दहा दिवस ‘श्री’ची मनोभावे आराधना केल्यानंतर आज दि. १९ सप्टेंबर रोजी ‘श्री’ स स्नेहपुर्ण निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी मनपा शहरात १६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारणार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी गणेश भक्तांनी इतरत्र विसर्जन न करता आपल्या मूर्ती संकलन केंद्रात दान देण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

दहा दिवस मुक्कामी राहणा-या श्री गणेशाचे आज विसर्जन होईल. भक्तांकडून पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन केले जातेविसर्जन करताना प्रदूषण होऊ नये,पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी विहिरी,तलाव व नद्यांमध्ये विसर्जन करु नये,असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे. लातूर शहरात मागील दोन वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे. मागील वर्षीही लातूरकरांनी प्रशासनास उस्फूर्तपणे सहकार्य केले होते. या वर्षीही गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करु नयेत यासाठी मनपाने संकलन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील १६ ठिकाणी अशी संकलन केंद्र उभारली जाणार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळे व घरात स्थापित केलेल्या गणेश मूर्तींचे संकलन या केंद्रांवर केले जाणार आहे. रविवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत मनपाचे कर्मचारी या केंद्रावर उपस्थित राहून मूर्तींचे संकलन करणार आहेत. शहरातील नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिका-यांनी स्थापित केलेल्या मूर्ती या केंद्रावर दान कराव्यात.पर्यावरण संवर्धन व प्रदूषण टाळण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे.

जागेवरच विसर्जनाचा लातूर पॅटर्न निर्माण करा
कोरोना व पर्यावरणासंदर्भातील इतर कारणे लक्षात घेऊन लातूर शहरातील व जिल्ह्यातील गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्तीची जागेवरच आरती करुन विसर्जन करावे व या मूर्ती महानगरपालिकेकडे सुपूर्द करुन लातूर पॅटर्नचा एक सुसंस्कृत असा पायंडा पाडावा, असे आवाहन लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी उदगीर शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला उदगीरकरांनी अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीने प्रतिसाद दिला. प्रत्येक गणेश मंडळांच्या गणेश भक्तांनी मंडपातच मूर्तीची आरती करुन विसर्जन केले व त्या सर्व मूर्ती पालिका प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. त्याच पद्धतीने लातूर शहरातील गणेश भक्तांनीही मंडपातच विसर्जन करुन या सर्व मूर्ती महानगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द कराव्यात व सुसंस्कृतपणाचा लातूर पॅटर्न निर्माण करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

‘श्री’ चे जागेवरच विसर्जन केल्याने कोविड नियमांचे पालन तर होईलच, त्याशिवाय आपण कोठेही विहिर, नद्या, नाले, अशा पाण्याच्या स्त्रोतात गणेश मूर्तींचे विसर्जन करीत होतो ते थांबेल, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केली. लातूरकर हे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे आहेत. याच लातूरने आपल्या उत्तम वर्तनातून अनेक पॅटर्न निर्माण केले आहेत. तसाच पॅटर्न गणेश विसर्जनाच्या बाबतीत निर्माण करावा, असेही आवाहन पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी केले. दरम्यान विसर्जन सोहळा लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षताही घेण्यात आली असल्याचे नमुद करुन गणेश भक्तांनी महापगरपालिकेने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या १६ मूर्ती संकलन केंद्रात गणेश मूर्ती नेऊन द्याव्यात अथवा महापालिकेच्या वतीने सुमारे ३० वाहने मूर्ती संकलनासाठी ठेवली आहेत, त्यांच्याकडे मूर्ती सुर्पूद कराव्यात, असे आवाहनही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

ही आहेत मूर्ती संकलन केंद्र
‘ए’ झोनमधील विशालनगर ग्रीन बेल्ट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय विहीर, बार्शी रस्त्यावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची टाकी परिसर, दयानंद महाविद्यालय पार्किंग परिसर, सरस्वती कॉलनीत पाण्याची टाकी येथे गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारले जाणार आहे. प्रभाग क्रमांक १०, ११, १२, १३ व १४ मधील नागरिकांना येथे गणेश मूर्ती दान करता येणार आहेत. ‘बी’ झोन मधील प्रभाग क्रमांक १५ व १६ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, प्रभाग १७ साठी बांधकाम भवन व प्रभाग क्रमांक १८ साठी शंकरपुरम ग्रीन बेल्ट व खंदाडेनगर कव्हा रोड येथे मूर्ती संकलन केंद्र उभारले जाणार आहे. ‘सी’ झोनमधील प्रभाग क्रमांक ३ व ४ साठी विवेकानंद चौक पाण्याची टाकी, प्रभाग ५ साठी लेबर कॉलनी, प्रभाग ३ साठी शिवाजी विद्यालय व प्रभाग क्रमांक ५ व ६ साठी मंठाळेनगर मधील मनपा शाळा क्रमांक ९ येथे मूर्ती संकलनाची सोय करण्यात आली आहे. झोन ‘डी’ मधील प्रभाग १ साठी अंबाजोगाई रस्त्यावरील बसस्थानक क्रमांक २ समोरील जागा, प्रभाग २ साठी नांदेड रस्त्यावरील यशवंत शाळा, प्रभाग क्रमांक ७ साठी यशवंत शाळा साळे गल्ली, प्रभाग १ व ८ साठी सिद्धेश्वर मंदिर व प्रभाग ९ साठी अंबाजोगाई रस्त्यावरील बसस्थानकासमोरील मोकळ्या जागेत मूर्ती संकलन केंद्र उभारले जाणार आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या