शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील राणी अंकुलगा, बाकली, विबराळ, उजेड, सांगवी-घुग्गी, साकोठ या गावावर प्रचंड मोठी ३० जुनच्या रात्री ढगफुटीमुळे पिकांसह जमीनी वाहून गेलेल्या व दुबार, तिबार पेरणीचे संकट आलेल्या नुकसानगृस्त शेतक-यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अडचणीत आलेल्या शेतक-यावर दि.३० च्या रात्री निसर्गाने प्रचंड मोठी अवकृपा केली असून ढगफुटी होवून या सात गावातील शेकडो शेतक-यांची शेती खरडून गेली असून, बांध बंदिस्ती वाहून गेली आहे. तर मातीचे थर येऊन बसले आहेत. अगोदरच दुबार पेरणीच्या संकटात अडकलेल्या शेतक-यांंवर तिबार पेरणीची वेळ आली आहे. त्यात शेत जमीन वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ढगफुटीमुळे अस्मानी संकटाच्या तावडीत सापडलेल्या शेतक-यांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना ठोस व भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून प्रत्यक्ष पहाणी दौरा करून उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर काँग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके, विजयकुमार पाटील, मधुकर पाटील, राजकुमार पाटील साकोळकर, अजित माने, संजय बिराजदार, अॅड. नारायण सोमवंशी, महेश देशमुख, गणेश गुराळे, महेश तिवारी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यांच्या स्वाक्ष-या आहेत.