22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरपं. कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनांचा नजराणा

पं. कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनांचा नजराणा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
संगीताचे ज्ञान, भाषांचे ज्ञान, काव्याची जाण, रसिकता आणि लोकाभिरुचीची ओळख या पाच गुणांवर प्रभुत्व असणारे वाग्गेयकार पं.कुमार गंधर्व यांच्या अलौकिक गायनातून कलाक्षेत्रातील अभिजात पर्व साकार झाले. ‘आवर्तन’ ही संगीतप्रसारास वाहिलेली संस्था, कुमारजींनी उलगडून दाखवलेल्या निर्गुणी भजनांचे दर्शन घडवणार आहे.

संगीत समीक्षक राघव मेनन यांनी भारतीय संगीताचे, कुमारपूर्व आणि कुमारोत्तर असे दोनच कालखंड आहेत, अशी महती सांगितली आहे. संपूर्ण कलाक्षेत्रावर कुमारजींच्या गायनाचा आणि विचारांचा प्रभाव पडला, असे अनेक जाणकार म्हणतात. पुढच्या पिढींसाठी पं. कुमार गंधर्व यांनी आपल्या परंपरेतील महत्ता अधोरेखित करून दाखवली. मीरा, सूरदास, तुलसीदास व तुकाराम यांच्या विचारांनुसार त्यांची भजने सादर केली. परंतु ते नाथपंथीयांच्या निर्गुणी भजनात मनापासून रमले. त्यांनी गोरखनाथ व कबीर यांची भजने निवडून त्यांतील खोलवर तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. संत कबीरांचे भाष्यकार व विख्यात साहित्यिक हजारीप्रसाद द्विवेदी म्हणत, कबीरजी कसं गायले असते? हेच कुमारजींनी त्यांच्या स्वरसृष्टीतून दाखवून दिलं आहे.

निसर्ग, तत्त्वज्ञान व कला यांचा तौलनिक अभ्यास करणारे अतुल देऊळगावकर हे, भारताला सुंसस्कृत करणा-या या चैतन्यपर्वाचे दर्शन घडविणार आहेत. अतिशय दुर्मिळ चित्रफिती तसेच पं. कुमार गंधर्व यांच्या मुलाखती यांमधून काही भजने सादर करणार आहेत. दि. २९ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात आयोजित केलेल्या ‘पं.कुमार गंधर्व: निर्गुणवाणी’ ह्या कार्पामास संगीत रसिकांनी उपस्थित रहावे, अशी विनंती, ‘आवर्तन’ च्या वतीने करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या