लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती संगीत कला महाविद्यालय व मराठवाडा संगीत कला अकादमी व रीसर्च सेंटरच्या वतीने आयोजित महाराजा पं. शारदा सहायजी संगीत समारोहामध्ये सुविख्यात कलावंतांनी केलेल्या उत्तूंग कलाविष्काराने लातूरकर श्रोते अक्षरश: मंत्रमुग्ध झाले. दोन दिवस चाललेल्या या समारोहात बनारस घराण्याचे सुविख्यात तबला नवाज पं. संजू सहायजी यांचे तबला वादन सर्वार्थाने अविस्मरणीय ठरले.
कार्यक्रमाची सुरेल सुरुवात सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या बालकलावंतांनी गायलेल्या श्री सरस्वती स्तवन व श्री गणेश स्तवनाने झाली. त्यानंतर प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार श्रीनिवास व अंबिका काटवे यांनी दशावतार सादर करुन रसिकांची उत्स्फूर्त दात घेतली. त्यानंतर मंचावर मुंबई येथील युवा हार्मोनियम वादक ओमकार अग्निहोत्री यांनी राग रुपक तालात छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर त्यांनी एकतालामधील बंदिश सादर केली. त्यानंतर लोकआग्रहास्तव त्यांनी एक धून गाऊन आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. त्यानंतर मंचावर विश्वविख्यात तबला नवाज पं. संजू सहायजी यांनी बनारस घराण्याच्या वादन शैलीनुसार सुरुवातीला उठाण, बनारसी ठेका, बांट,चक्रधार, गत, कायदा, गत परन,त्रिपल्ली गत, उठाण, भूमिका असे प्रकार अतिशय तयारीने उत्स्फूर्तपणे सादर करुन रसिक श्रोत्यांची मने जिंकली. या समारोहाचे उद्घाटन रुईभर दत्त संस्थान प्रमुख सद्गुरु आप्पाबाबा महाराज रुईभरकर यांच्य हस्ते सरस्वती मातेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करुन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, उद्योजक तुकाराम पाटील, मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तालमणी डॉ. राम बोरगावकर, सुरमणी पं. बाबुराव बोरगावकर हे उपस्थित होते.
दुस-या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात गानसम्राज्ञी किशोरीताई अमोणकर यांच्या पट्टशिष्या मधुवंती बोरगावकर – देशमुख यांच्या गायनाने झाली. त्यांनी बोलावा विठ्ठल, या पंढरीचे सुख, बंदिश सहेला रे या किशोरीताईंच्या भक्तीरचना अतिशय दर्जेदारपणे सादर करून रसिकांची उत्स्फूर्त दाद घेतली.त्यांना हार्मोनियम साथ सुरमणी पं. बाबुराव बोरगावकर यांनी दिली तर तबलासंगत प्रा. गणेश बोरगावकर यांनी केली. त्यानंतर सरस्वती बोरगावकर यांनी गायन सादर केले. सुप्रसिद्ध युवा पार्श्वगायक मंगेश बोरगावकर यांनी त्या फुलांच्या गंध कोशी, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले या रचना भावपूर्ण स्वरामध्ये गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना हार्मोनियम साथ ओमकार अग्निहोत्री यांनी दिली तर तबला साथ सिद्धार्थ थत्ते यांनी दिली. त्यानंतर ‘तालदर्शन ‘ हा तालमणी डॉ. राम बोरगावकर यांचे शिष्य प्रा. अनिल डोळे यांनी शिष्यपरिवारासह सादर केला. यामध्ये सात जणांचा सहभाग होता.
यानंतर विश्वविख्यात गायिका इंद्राणी मुखर्जी यांनी शास्त्रीय गायनास सुरुवात केली. त्यांनी राग बिहाग मध्ये विलंबित बडाख्यालमध्ये बंदिश सादर केली. त्यांना तितक्याच तयारीने तबलासंगत विश्वविख्यात तबलानवाज पं. संजू सहायजी यांनी केली. त्यांना हार्मोनियम साथ ओमकार अग्निहोत्री यांनी केली. या समारोहाप्रसंगी दुस-या दिवशी सन्माननीय अतिथी म्हणून अहमदपूरचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. शोभा जाधव, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, धर्मादाय सहाय्यक उपायुक्त बी. डी. कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, प्रा. शिवराज मोटेगावकर, द्वारकादास श्यामकुमारचे संचालक तुकाराम पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिता देशपांडे आणि डॉ. सुदाम पवार यांनी केले. तर या समारोहाप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले.