लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले असून ८ ते १७ ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वराज्य महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ ही मोहिम दि. १३ ते १५ ऑगसटपर्यंत राबविली जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, बचत गट यांच्याकडून तिरंगा झेंडा विक्री केंद्रही गावोगावी सूरु केली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी सांगितली आहे.
दिनांक ८ ऑगस्ट रोजी ग्रामससेवक व वार्ड अधिकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रासभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभेत आजादी का अमृत महोत्सव या विषयावर चर्चा करावी. हर घर झेंडा हा उपक्रम प्रत्येक नागरिकांनी राबवावा याविषयी ग्रामसभा घेऊन माहिती सांगावी असे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत रोज संध्याकाळी स्मार्ट टी. व्ही., प्रोजेक्टरद्वारे क्रांती ( १९८१ ) हा देशभक्तीपर चित्रपट दाखविण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. दि. ९ ऑगस्ट रोजी सर्व ग्रामस्थ, गृहिणी यांनी प्रत्येक नागरिकांनी पारासमोर सडा रांगोळी करावी. घराला तोरण बांधावे आणि गावातील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे.तसेच ग्रामसेवक, सरपंच, वार्ड अधिकारी, शिक्षक विद्यार्थी व अंगणवाडी सेवक, अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी स्वातंर्त्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गावातील ज्येष्ठ मंडळींनी व स्वातंर्त्य सैनिकांकडून गावक-यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात, रस्त्याच्याकडेला स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दिलेल्या नेत्यांचे फोटो लावावेत. शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजन करावे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टद्वारे देशभक्तीपर चित्रपट-‘कर्मा ‘ दाखविण्यात यावा.
दिनांक १० ऑगस्ट रोजी ग्रामसेवक, सरपंच यांनी गावातील महत्वाची सार्वजनिक ठिकाणे, वास्तू व वारसास्थळे या ठिकाणची स्वच्छता करुन सुशोभिकरण करावे. शाळेत निबंध व रांगोळी स्पर्धा घेण्यात याव्यात. तसेच यासोबतच महिला मेळावे अंगणवाडी सेविका व आशा वर्कर, शाळेतील शिक्षिका यांनी पुढाकार घेवून महिला मेळाव्याचे आयोजन करावे. स्वातंर्त्यविषयी मार्गदर्शन करावे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टरद्वारे देशभक्तीपर ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक ‘ दाखविण्यात यावा. दि. ११ ऑगस्ट रोजी महिला बचत गट मार्गदर्शन, गावाचा, राष्ट्राचा इतिहास, दि. १२ ऑगस्ट रोजी मोबाईल दुष्परिणाम मार्गदर्शन व चर्चा, दि. १३ ऑगस्ट रोजी गोपाळांची पंगत, सेंद्रीय शेती मार्गदर्शन, शेतकरी मेळावे, पर्यावरण संवर्धन शपथ, दि. १४ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण, दि. १५ ऑगस्ट रोजी शाळा कॉलेज, सर्व कार्यालये व ग्रामस्थ प्रभातफेरी काढावी. विद्यार्थ्यांच्या हातात गावातील क्रांतिकारकांची नावे असणारे फलक, अनसंग हिरो यांची नावे/फोटो असणारे फलक देण्यात यावेत.
गावात विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिस वितरण करणे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टरद्वारे देशभक्तीपर चित्रपट – ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ दाखविण्यात यावा. दि. १६ ऑगस्ट रोजी किशोरी मेळावे, दि. १७ ऑगस्ट रोजी स्वराज्य महोत्सव सांगता समारोह करतांना प्रभात फेरीचे आयोजन करावे. देशभक्तिपर स्फुर्तीदायक गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत, महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. संध्याकाळी स्मार्ट टीव्ही / प्रोजेक्टरद्वारे देशभक्तीपर चित्रपट ‘लक्ष््य’ दाखविण्यात यावा. ८ ते १७ ऑगस्टपर्यंत स्वराज्य महोत्सवांतर्गत हे वरील कार्यक्रम घेण्यात येणार असून यातून नव्या पिढीला स्वातंत्र्याचे मोल, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, त्याग कळेल, अशी या मागची भावना असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.