21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूररेल्वेमार्ग समांतर रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करावा-पालकमंत्री अमित विलासराव देशमुख

रेल्वेमार्ग समांतर रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करावा-पालकमंत्री अमित विलासराव देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पीव्हीआर चौक ते राजस्थान विद्यालय या जुन्या रेल्वेमार्ग असलेल्या समांतर रस्त्याची पाहणी करुन हा रस्ता पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महापालिका, पोलिस व जिल्हा प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, महापालिका विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ, अ‍ॅड. किरण जाधव, अ‍ॅडद्य समद पटेल, बंटी जाधव, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, तहसीलदार स्वप्निल पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रोहन जाधव यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख यांनी जुन्या रेल्वे लाईन च्या रस्त्याची पी. व्ही. आर. चौक, वाल्मिकनगर चौक, पाण्याची टाकी, दयानंद गेट, शिवाजी चौक, देशिकेंद्र शाळेसमोरचा पूल, राजस्थान विद्यालय समोरील रस्ता या ठिकाणी थांबून रस्त्यावरील अतिक्रमणे पार्किंग व्यवस्था या बाबींची पाहणी केली. सद्यस्थितीत महात्मा गांधी चौक ते पीव्हीआर चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हा जुना रेल्वे लाईनचा रस्त्यावरील अतिक्रमणे मोकळी करणे आवश्यक आहे.

यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणा-या वाहतुकीची कोंडी बाबत पोलीस विभागाकडून माहिती घेतली. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची कंपाउंड वॉल सहा मीटरने कमी करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रुंदीकरण करण्यात आल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, पीव्हीआर चौक, व पाण्याची टाकी या भागातून येणारी वाहतूक अंबेजोगाई रोडकडे जाण्यासाठी शिवाजी चौकात थांबण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज, महापालिका आयुक्त मित्तल व पोलीस अधीक्षक पिंगळे यांनीही अतिक्रमणे काढणे, रस्ता रुंदीकरण, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता व सुरळीत वाहतूक व्यवस्था या बाबतची माहिती दिली.

भाजीविक्रेत्यांशी चर्चा करुन त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी
पाण्याची टाकी ते दयानंद गेटपर्यंत जे भाजीविक्रेते बसतात त्यांच्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करुन हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन पोलीस विभाग व महापालिकेने एकत्रित बसून याबाबत नियोजन करावे. तसेच या रस्त्यावरील बसणारे भाजीविक्रेते साठी पर्यायी जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

रस्ता किमान पंधरा दिवस वनवे वाहतुकीसाठी खुला करावा
पाणीचे टाकी या चौकात समांतर रस्त्याच्या बाजूला पार्किंग प्लाझा करणे शक्­य आहे का याची चाचपणी करावी. या जुन्या रेल्वे लाईन मार्गाच्या बाजूला असलेल्या सर्विस रोडवरील ही अतिक्रमणे मोकळी करावीत व हा संपूर्ण रोड एकत्रित करून वाहतूकीसाठी खुला करावा. पोलीस व महापालिकेने शिवाजी चौक ते पीव्हीआर चौक हा बार्शी रोड जिल्हाधिकारी कार्यालयकडे जाण्यासाठी वनवे करावा तर समांतर रस्ता पीव्हीआर चौक ते राजस्थान विद्यालय पर्यंत वाहतुकीसाठी वनवे करावा. प्राथमिक स्तरावर ही व्यवस्था पंधरा दिवसापुरती करून पाहावी व त्यानंतर या रस्त्यांची उपयोगिता व वाहतुकीची सुलभता पाहून निर्णय घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करा, आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या