23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरपाऊस १३८ मि. मी. पेरणी २५ टक्केच

पाऊस १३८ मि. मी. पेरणी २५ टक्केच

एकमत ऑनलाईन

लातूर : पर्जन्य छायेखालील भाग अशी ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात या वर्षी मृग नक्षत्रातील पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्हाभरात पेरणीला वेग आलेला नाही. मृग नक्षत्रात जिल्ह्यात सरासरी १३८ मि. मी. पाऊस झालेला असला तरी, पेरण्या मात्र केवळ २५ टक्केच झालेल्या आहेत. मृगातील पावसाने निराशा केली असल्याने आता सर्वांच्या नजरा आर्द्राकडे लागलेल्या आहेत.

येत्या चार दिवसांत पाऊस पडणार नाही, असे हवामान विभागाच्या वतीने घोषीत करण्यात आले आहे. पावसाबद्दल अधिकृतपणे कोणी माहिती देत नसले तरी आर्द्रा नक्षत्रातही पेरणीयोग्य पाऊस पडेल, असा विश्वास कोणी द्यायला तयार नाही. यंदा चांगला आणि वेळेच्या आत पाऊस पडेल, असा अंदाज पावसाळ्यापूर्वीच तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानूसार शेतक-यांनी एप्रिल, मे चे चटकते उन्ह अंगावर घेत शेतीची मशागत करुन खरीप हंगामासाठी शेतजमीन तयार केली होती. मान्सूनच्या प्रारंभी पावसाला सुरुवातही झाली. तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतोय, असे सर्वांनाच वाटू गेले. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीची तयारी केली. एकीकडे साधारणत: १०० मि. मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते तर दुसरीकडे पाऊसही पडत गेला. त्यामुळे शेतक-यांनी पेरणीस प्रारंभ केला आणि पाऊस अचानक थांबला.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १३८ मि. मी. पाऊस पडला आहे. पेरण्या मात्र केवळ २५ टक्केच झाल्या आहेत. हा झालेला पाऊस गतवर्षीपेक्षा अधिक असला तरी तो उदगीर, अहमदपूर, चाकुर, अशा भागात आहे. उदगीर, अहमदपूर भागात पेरण्यांनी वेग घेतला असला तरी निलंगा, रेणापुर, देवणी या तालुक्यांत अतिश्य अत्यल्प पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांची आशा आर्द्रावर आहे. मृग नक्षत्राने दिलेली हुलकावणी आणि असमान पाऊस यामुळे शेतकरी पेरणीला धजत नाहीत. उदगीर तालुक्यात सर्वाधिक ६७ टक्के पेरण्या झाल्या आहेत तर निलंगा तालुक्यात केवळ २६ टक्के, चाकुर २५ टक्के, लातूर १५ टक्के, जळकोट १९ टक्के, शिरुर अनंतपाळ तालुक्यात १० टक्के पेरण्या झाल्या आहेत. या वर्षी पाऊसच असमान असल्याने मंडळातील काही गावात पेरणी आहे तर काही गावात पेरण्या झालेल्या नाहीत. मृग नक्षत्रावरच पेरणीचे भवितव्य अवलंबुन असते. मात्र यंदा मृग नक्षत्रानेच हुलकावणी दिलेली आहे. आतापर्यंत जितका पाऊस पडला त्या पावसावर ज्या शेतक-यांनी धाडस करुन पेरण्या केल्या त्यांना आता पावसाची चिंता आहे. पाऊसच नसल्याने अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने उगवण झालेली नाही.

ज्या गावात पेरण्याला प्रारंभ झालेला नाही त्यांना आणखीन आर्द्रा नक्षत्र, पुष्य नक्षत्राची देखील प्रतिक्षा आहे. बियाण्यांचा तुटवडा असताना पेरणीचे धाडस करणे हे शेतक-यांना अंगलट येण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करायची नाही, अशा मन:स्थितीत आहेत.

मंडळात चांगला पण तालुक्यात अत्यल्प पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत असमान पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस निलंगा तालुक्यात झाला. त्यानंतर देवणी तालुक्यात व नंतर रेणापूर तालुक्यात आहे. रेणापूर मंडळात अतिश्य चांगला पाऊस आहे. मात्र, तालुक्यात अत्यल्प पाऊस आहे. चाकुर शहरात पडलेला पाऊस हा साडेतीनशे मि. मी. एवढा आहे. मात्र निलंगा तालुक्यातील हलगरा मंडळात केवळ ३५ मि. मी. पाऊस आहे.

चिंचणी गाव झाडामुळे बनले ऑक्सीजन पार्क

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या