लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या मोसमी पावसाचा प्रवास सुरु असतानाच लातुर शहर व परिसरात दि. २० मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने गटारी तुंबून गटारीतील घाण पाणी रस्त्यावर आले. प्लास्टीकच्या पिशव्या, कचरा रस्त्यावर पसरल्याने दुर्गंधी सुटली. शहरातील सखल भागात गटारीचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यत वर्तविण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे सूर्योदयालाच उष्णात सुरु झाली. दुपारी तीव्र उन्हाने तापमान ३९ अंशसेल्सिअसपर्यंत गेले. दुपारी ३ वाजल्यानंतर हवामानात बदल व्हायला सुरुवात झाली. प्रारंभी जोरदार वारे सुटले. त्यामुळे रस्त्यांवरी कचरा आणि धुळ आकाशात उंचच उंच गेली. सर्वत्र धुराळा पसरला होता. दुचाकी चालकांना त्याचा प्रचंड त्रास झाला. धुळ डोळ्यात गेल्याने अनेक ठिकाणी वाहतूकीस अडथळे आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर आकाश ढगांनी व्यापून गेले आणि पावसाला सुरुवात झाली. पावसाचा मोठा सडाका अचानक आल्याने नागरिाकांस फु टपाथवरील छोटे व्यवसायीक, हातगाडीवाले, भाजीपाल विक्रेते यांची तारांबळ झाली. एकच धावपळ सूरु झाली. पाऊस एकदम थांबला. त्यामुळे पुन्हा सर्व सुरळीत झाले परंतू, निसर्गाच्या मनात वेगळेच होते. थोड्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. नंतर आलेला पाऊस मात्र मोठा होता.
मोठ्या पावसामुळे शहरातील सर्वच गटारी वाहत्या झाल्या. परंतु, गटारींतील प्लास्टीक पिशव्या, प्लास्टीकचे ग्लास, बाटल्या आणि कच-यामुळे गटारी तुंबल्या व गटारीतील घाण पाणी रस्त्यांवर आले. गटारीतील कचरा रस्त्यावर पसरल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटली होती. शहरातील संजयनगर, इस्लामपूरा, अंजलीनगर, बादाडेनगर, क्वॉईलनगर इंदीरानगर, राजीवनगर आदी सखल भागातील गटारी पाण्याने भरुन वाहिल्या. रस्ते जलमय झाले. त्यामुळे हे वाहते घाण पाणी अनेकांच्या घरांनी शिरले. परिणामी नागरिकांची तारांबळ उडाली.