औसा : औसा शहरासह तालुक्यात शनिवार दि. १९ सप्टेंबर मध्यरात्री अतिवृष्टीने कहर केला असून शहरातील जुन्या घरांच्या भिंती पडल्या असून अनेक शेतक-यांच्या शेतातील खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शनिवारी मध्यरात्री २ पासून पहाटे ५ वाजेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील जुन्या गाव भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले. तहसील कार्यालयांच्या समोरील गाव तलाव तुडूंब भरला असून सांडव्यातून पाणी काढून देण्यात आले आहे.
पावसाने ४ तास कहर केल्याने शेतक-यांच्या शेतातील सोयाबीन, तूर ही पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक शेतक-यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत. शहरालगत असलेल्या हडोला शिवारात नाल्याचे पाणी आणि घाण गेल्याने सोयाबीन नष्ट झाले आहे. आलमला उंबडगा आणि भादा रोडवरील पुलावरून पाणी शेतात घुसले आहे. औसा शहरातील जुन्या घरांच्या भिंतीची पडझड झाली असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
मृग नक्षत्राच्या मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झाल्याने अनेक शेतक-यांचे सोयाबीन कापणीस आले असून आता सोयाबीन काढणीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. पावसाने मोठा कहर केल्यामुळे अनेकांच्या शेतात तळयाचे स्वरूप आले आहे. शेतातील बांध फुटून अनेक शेतक-यांच्या शेतातील माती वाहून गेली असून दि. २५ सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे लोक व शेतकरी भयभीत झाले आहेत.
यापूर्वी तालुक्यातील शेतक-यांच्या शेतात उभ्या मुगाला जागेवर मोड फुटल्याने मुगाचे पीक हातचे गेले होते. आता अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीकचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हरवला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कनिथोट परिसरात सर्वाधिक पाऊस
औसा तालुक्यात दि. १९ सप्टेंबर रोजी कनिथोट महसूल मंडळात १४० (७३२) सर्वाधिक पाऊस झाला आहे. तसेच औसा १३१ (८००), भादा ४५ (५७१), किल्लारी १० (६८१), लामजना ३६ (८३५), मातोळा १२ (६७३), आणि बेलकुंड १५ (५७८) मिली मीटर पाऊस झाला असून कंसातील आकडे आजपर्यंतच्या महसूल मंडळ आतापर्यंतच्या झालेल्या पावसाची आहेत. औसा तालुक्याची पावसाचे सरासरी ७७४ मिलिमीटर असून आत्तापर्यंत तालुक्यात सरासरी ६९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
ठेकेदाराच्या मनमानीमुळे घरात, शेतात शिरले पाणी