23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeलातूर‘रामकली’ रागाने दिवाळी पहाट बनली सुरेल

‘रामकली’ रागाने दिवाळी पहाट बनली सुरेल

एकमत ऑनलाईन

लातूर : यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे दिवाळी पहाट या सुरम्य अशा सुरेल अशा सांगीतिक मेजवानीला रसिक मुकणार की काय अशी भीती मनात होती. परंतु लातूर येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्यावतीने अखेर दिवाळी पहाट संपन्न झाली आणि रसिक सुरतालांच्या अतिषबाजी मध्ये अक्षरश: न्हाऊन निघाले. यामध्ये प्रसिद्ध युवा गायिका डॉ. वृषाली देशमुख यांचे गायन संपन्न झाले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात रामकली या रागाने केली.

यावेळी नगरसेविका सौ. वर्षा कुलकर्णी, डॉक्टर श्री व सौ अहंकारी, लातूरचा विनोदवीर बालाजी सुळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाल. यावेळी आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, प्रा. हरीसर्वोत्तम जोशी, केशव जोशी उपस्थित होते.अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी अविरतपणे सुरू असलेल्या आवर्तन मासिक संगीत सभेला तब्बल ६८ महिने पूर्ण झाले. याच संगीत सभेमध्ये दरवर्षी दिवाळी पहाट या सांगीतिक मैफिलीचे आयोजन मागील सहा वर्षापासून अष्टविनायक मंदिराच्या परिसरामध्ये दीपोत्सवासह केले जाते. परंतु सध्या सर्वच ठिकाणी मंदिरांना उघडण्यास परवानगी दिलेली नव्हती. याच पार्श्वभूमीवर कार्यक्रम तर संपन्न झालाच पाहिजे या जिद्दीने या कार्यक्रमाचे आयोजन लातूर येथील गायत्री उत्सव या सभागृहांमध्ये दि. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता केले गेले. यामध्ये प्रसिद्ध युवा गायिका डॉ. वृषाली देशमुख यांचे गायन संपन्न झाले.

युवा गायिका डॉ. देशमुख यांनी आपल्या गायनाची सुरुवात रामकली या रागाने केली. यामध्ये मध्यलय झपतालामध्ये सनम काहे ही बंदिश सादर केली. त्यानंतर सगरी रैन के जागे पागे ही तिनताल मधील पारंपरिक बंदिश सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीत रामकली नंतर प्रात:कालीन राग देसी गाण्यासाठी निवडला यामध्ये मध्यलय एकताला मध्ये बंदिश बोलत कोयल डोलत है मुरवा व द्रुत तीनताल मनुवा लरजे मोरा मध्ये बंदिश सादर केली. रागाची शास्त्रशुद्ध मांडणी स्वच्छ आलाप, लयकारी युक्त बेहलावे, दाणेदार ताना, सरगम यामुळे मैफिल अधिकच खुलत गेली. यानंतर रंगी सारी, त्यानंतर तेरो चाकर करे पुकार भवानी बेग पाधारो ना व शेवटी गोविंद गोविंद हा तुकारामांचा अभंग डॉक्टर वृषाली देशमुख यांनी स्वत: भैरवी रागामध्ये स्वरबद्ध केला होता. तो सादर केला व आपल्या गायनाला पूर्णविराम दिला.

त्यांना तबल्यावर अतिशय उत्तम अशी साथ-संगत लातूर येथील प्रसिद्ध युवा तबलावादक प्रा. एकनाथ पांचाळ यांनी व संवादिनी साथ प्रा. शशिकांत देशमुख यांनी अतिशय समर्पकपणे केली. तानपुरा व स्वसाथ कमलाक्षी कुलकर्णी व शर्वरी डोंगरे यांनी केली. या मैफलीसाठी अनदुर येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री व सौ अहंकारी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप जगदाळे यांनी केले. ही संपूर्ण दिवाळी पहाटची मैफिल सर्व रसिकांना फेसबुक लाईव्हद्वारे दाखवण्यात आली.

 

अलिप्ततेतच शहाणपण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या