लातूर : कोरोना प्रतिबंधासाठी लातूर महानगरपालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांतंर्गत शहरातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक रॅपीड अँटीजन टेस्ट किट्सची मागणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसांत महानगरपालिकेने शहरातील दोन क्वारंटाईन सेंटरमधील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील १२२ जणांची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, नगरपालिका, नगरपंचायतीसह तालुका स्तरावरील यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे. सर्व यंत्रणा पुर्ण क्षमतेने कामाला लागली आहे. कोरोनाबाधिताच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्या संपर्काचा शोध घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे.
लातूर शहरातील महानगरपालिका प्रशासनानेही सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्यावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याकरीता विविध उपाययोजना करुन त्या काटेकोरपणे राबविल्या जात आहेत. शहरातील राजीवनगर, इंडियानगर, मंठाळेनगर, गौत्तमनगर, प्रकाशनगर, तावरजा कॉलनी, सिद्धार्थ सोसायटी, बौद्धनगरमधील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपीड अँटीजन टेस्ट केल्या जाणार आहेत.
महानगरपालिकेने दि. २९ जुलैपासून रॅपीड अँटीजन टेस्ट सुरु केल्या आहेत. हायरिस्कमधील रुग्णकडे विशेष लक्ष दिले जात आहे. एखाद्या घरी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील त्याच्या कुटूंबातील व्यक्ती, शेजारील व्यक्तींना तात्काळ क्वॉरंटाईन करुन त्यांची रॅपीड अँटीजन टेस्ट केली जात आहे.
या रॅपीड अँटीजन टेस्टसाठी महानगरपालिकेला २ हजार ७०० रॅपीट अँटीजन टेस्ट किट मिळालेल्या आहेत. येथील डालडा फॅक्ट्री कंपाऊंडमधील समाज कल्याण विभागाचे वसतीगृह व औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचे वसतीगृह या दोन क्वॉरंटाईन सेंटरमधील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील १२२ व्यक्तींची रॅपीड अँटीजन टेस्ट गेल्या पाच दिवसांत करण्यात आली आहे. २ हजार ७०० रॅपीड अँटीजन टेस्ट किट्सपैकी १२२ किट्स वापरात आल्या आहेत तर २ हजार ६७८ किट्स शिल्लक आहेत.
मनपाला हवेत अडीच हजार रॅपीड अँटीजन टेस्ट किट्स
२ हजार ५०० रॅपीड अँटीजन टेस्ट किट्सची मागणी महानगरपालिकेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे करण्यात येणार आहे. हायरिस्कमधील जास्तीत जास्त नागरिकांची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा उद्देश असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
तीन लॅब टेक्निशियन करतात तपासणी
डालडा फॅक्ट्री कंपाऊंडमधील समाज कल्याण विभागाचे वसतीगृह व औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचे वसतीगृह या दोन क्वॉरंटाईन सेंटरमधील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यासाठी वाजीद सय्यद, प्रियंका झुंजे व स्वप्नील जाधव हे तीनच लँब टेक्निशियन कार्यरत आहेत. त्याशिवाय नोंदणीसाठी २ एएनएम, १ वॉर्ड बॉय, असे मनुष्यबळ आहे. सध्याची कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता तंत्रज्ञांसह इतर मनुष्यबळ वाढविणे आवश्यक आहे.
पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर मिळाली गती
रॅपीड अँटीजन टेस्ट मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे, त्यासाठी आवश्यक किट्स, इतर साहित्य, मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दि. ३० जुलै रोजी झालेल्या लातूर जिल्हा कोविड-१९ च्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानूसार रॅपीड अँटीजन टेस्टला गती मिळत आहे.
लातूर कसं शांत…शांत
कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन दि. १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत पुनश्च लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे लातूर शहरात लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळण्याकडे लातूरकरांचा कल वाढलेला दिसून येत आहे. रविवारी लॉकडाऊन जरा जास्तच कडक जाणवला कारण लातूर कसं शांत…शांत होतं.
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १ ते १५ ऑगस्ट या कालावधीतील लॉकडाऊनमध्ये पुर्वीच्या लॉकडाऊनपेक्षा जास्त कडक नियम लातूर शहर व लगची गावे गंगापूर, पेठ, चांडेश्वर, खोपेगाव, कव्हा, कातपूर, बाभळगाव, सिकंदरपूर, बसवंतपूर, खाडगाव, पाखरसांगवी, कोळपा, हरंगुळ बु., बोरवटी, मळवटी, वरवंटी, आर्वी, वासनगाव, हणमंतवाडी, महाराणाप्रतापनगर हद्दीत कडक नियम केले आहेत. त्यामुळे शहरासह या २० गावांतील सर्व व्यवहार ठप्प आहेत. लॉकडाऊन असले तर काही हौशी लोक उगीच वाहनांवर बसुन शहरात फेरफटका मारतात. अशा लोकांवर पोलीस कारवाई करीत असतात. रविवारी मात्र शहरात अभावानेच पोलीस दिसले. पोलीस बंदोबस्त फारसा नव्हता तरी शहर शांत…शांत होते.
Read More नांदेडात कोरोना २ हजार पार