22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूर‘मेस’चे दर वाढले; विद्यार्थी आक्रमक

‘मेस’चे दर वाढले; विद्यार्थी आक्रमक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूर शहरात शिक्षणासाठी संपूर्ण महाष्ट्रातून हजारो विद्यार्थी आलेले असतात. राहण्यासाठी भाड्याची खोली आणि जेवणासाठी मेस (खानावळ), अशी त्यांची व्यवस्था असते. वार्षिक आर्थिक बजेटमध्ये या सर्व गोष्टी बसून विद्यार्थी येथे राहतात. परंतू, शहरातील मेस चालकांनी अचानक मेसच्या दरात ५०० ते ६०० रुपयांची वाढ केल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक परित्रा घेत मंगळवारी तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मेस चालकांनी दरवाढ मागे घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती.

शहरातील मेस चालक विशेषत: दयानंद महाविद्यालयााच्या परिसरातील खाडगाव रोडवरील मेस चालकांनी मेसच्या दरमहा दरात अचानक ५०० ते ६०० रुपयांनी वाढ केली. या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी दयानंद महाविद्यालय गेट परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले. तेथुन विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मेसच्या दरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देत विद्यार्थी तहसील कार्यालयाच्या परिसरात आले. विद्यार्थी मोठ्या संख्येने होते आणि आक्रमकही होते. मेस चालकांनी २००० रुपयांवरुन दरमहाच्या दरात अचानक ५०० ते ६०० रुपयांची वाढ केली. ही दरवाढ आम्हाला परवडत नाही, त्यामुळे ही दरवाढ मेस चालकांनी मागे घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.

शिक्षणाचा लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरला येतात. शाळा, महाविद्यालयांपासून ते शिकवणी वर्ग, एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारेही बाहेर गावचे विद्यार्थी लातूर शहरात मोठ्या प्रमाणात राहतात. भाड्याच्या खोलीत राहत असताना मेस हाच त्यांच्या जेवणाचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे शहरात मेसचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी शक्यतो आपल्याला परवडणा-या मेसमध्येच जेवतात. परंतू, महागाई वाढल्याच्या कारणावरुन मेस चालकांनी एकत्र येऊन मेसचे दरमहा दर ५०० ते ६०० रुपयांनी वाढवले. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुर्णत: मेसवर अवलंबुन असणा-या विद्यार्थ्यांची संख्या खुप मोठी आहे. त्यातील बहुतेक विद्यार्थी गरीब, शेतकरी कुटूंबातील आहेत. मेस चालकांनी अचानक वाढविलेल्या दरमहा दरामुळे हे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

मेसचा धंदाच बंद करण्याची वेळ आली…
गेल्या सहा-सात वर्षांपासून लक्ष्मी भोजनालय या नावाने मेस चालविणारे आबा तोडमे यांनी अडचणींचा पाढाच सांगीतला. ते म्हणाले, गहू, तांदूळ, तेल, मसाले, दाळी, स्वयंपाकाच्या गॅससह व्यवसायीक गॅस, वीजबील, हॉटेलचे भाडे, घरभाडे, कामगारांची पगारी या सर्वच गोष्टींत दुप्पट-तिप्पट वाढ झाली आहे. चविष्ठ जेवण दिले जाते, क्वॉलिटीमध्ये कसलिही तडजोड केली जात नसल्याने आमच्या विद्यार्थी संख्या चांगली आहेत. परंतू, महागाईमुळे परवडतच नाही. शिवाय आमच्याही मुलांचे पालण-पोषण, शिक्षण आदी विषय आहेतच ना. त्यामुळे ४०० ते ५०० रुपये दरवाढ करण्याचा प्रयत्न केला होता. विद्यार्थ्यांची आमची अडचण समजून घेणे अपेक्षीत होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आता मेसचा धंदाच बंद करुन दुसरा काहींतरी व्यवसाय करण्याची वेळ आल्याचेही आबा तोडमे म्हणाले.

आज सर्व मेस सूरु होणार
लातूर शहरात ५०० हून अधिक मेस आहेत. मात्र महागाईच्या कारणावरुन मेस चालकांनी मंगळवारी मेस बंद ठेवल्या व दरमहा दरात ४०० ते ५०० रुपयांची वाढ केली. परंतू, या निर्णयाला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला. तहसीलवर मोर्चा काढला. पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मेस चालकांचे प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर मेसच्या वाढीव दराबाबत निर्णय न होता बुधवारपासून मेस पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय झाल्याने आज सर्वच मेस सुरु होणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या