लातूर : प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम मौजे पानगांव, ता. रेणापुर येथील आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ‘मशाल रॅलीचे’ आगमन झाले. त्यानंतर मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लातूर शहरातील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयात मशाल रॅलीचे आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले.
मराठवाड्यातील कारगिल युद्धात शहीद झालेले शहीद जवान बालाजी माले यांना अभिवादन करुन, मराठवाड्यातील सर्व महाविद्यालयात या मशाल रॅलीचे असे स्वागत करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, युवक-युवती व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वातंत्र्य चळवळीचा जयघोष करण्याबरोबर मशाल रॅलीत, आजादी अमृत महोत्सव वर्षाचे स्वागत करीत आहेत. यावेळी रॅलीचे आयोजक, समन्वयक आणि मशाल हाती घेऊन प्रत्येक महाविद्यालयात भेट देणारे प्रा. डॉ. साईनाथ उमाटे, प्रा. डॉ. कल्याण सावंत, प्रा. डॉ. सुदर्शन पेडगे, प्रा.डॉ. गौरव जेवळीकर यांची विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी प्रास्ताविक पर विचार व्यक्त केले. स्वातंत्र्याची मशाल आपण सर्वांनी मिळून निरंतर तेवत ठेवण्याबरोबरच ज्या थोर महापुरुषांनी, स्वातंत्र्यवीर यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या देशाचे रक्षण करण्याबरोबरच आपल्या भारत देशाने पाहिलेले महासत्तेचे स्वप्न राष्ट्र सेवेतून साकार करु या, असे आवाहन केले. प्रा. डॉ. साईनाथ उमाटे यांनी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि आपणास मिळालेले स्वातंत्र्य, आपल्या देशाचे संविधान आणि या देशाचे नागरिक म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य, जबाबदारीची जाणीव ठेवून आपण सर्वांनी अखंड भारतासाठी प्रयत्न कसे करावे. याविषयी मौलिक माहिती दिली.यावेळी प्रा. डॉ. सुदर्शन पेडगे यांनी सर्वांना शपथ दिली. आम्ही भारताचे नागरिक, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शपथ घेतो की, ‘भारताची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता बाधित होईल अशी कृती करणार नाही.
राष्ट्राची अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी मी प्रयत्न करीन. भारतीय संविधानाने घालून दिलेल्या मूल्यांचे मी जतन करीन. भ्रष्टाचार, जातीयता, वंशवाद या व अशा देश विघातक कृत्यापासून मी दूर राहीन. माझा देश वैभवच्या शिखरावर विराजमान करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. मी राष्ट्रावर येणा-या सर्व संकटांचा संपूर्ण शक्तीशी सामना करण्याची प्रतिज्ञा घेत आहे. ही प्रतिज्ञा सर्वांनी मिळून घेतली. याप्रसंगी स्वातंर्त्य चळवळीत ज्या थोर महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या त्यागाची सेवेची कार्याची माहिती असलेले प्रदर्शन सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पाहिले. सर्वांनी मिळून राष्ट्रगीत म्हटले. स्वातंत्र्याचा जयघोष करीत मशाल रॅलीचे आगमन शहरातील अनेक महाविद्यालयात झाले.