लातूर : प्रतिनिधी
सद्यस्थितीत समाजात विविध छोट्या-मोठ्या कारणांमुळे घटस्फोटीतांचे प्रमाण वाढते आहे, ही बाब चिंतेची असून सामाजिक बांधिलकीतून यावरील एक उपाय म्हणून वीरशैव लिंगायत समाज लातूरच्या वतीने येत्या दि. २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता येथील खंडोबागल्लीतील वीरशैव सांस्कृतिक भवन येथे पूनर्विवाह परिचय मेळावा व पूनर्मिलन अभियान आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती विवेक जाणते व उमाकांत कोरे यांनी दिली.
वीरशैव लिंगायत समाज लातूरच्या वतीने २०१९ पासून घटस्फोट या सामाजिक समस्येवर सामाजिक जाणीवेतून पूनर्विवाह व पूनर्मिलन हा स्तुत्य उपक्रम सुरु केलेला आहे. पूनर्विवाह हे एक धाडस, तडजोड असून पूनर्मिलन म्हणजे एक स्वीकार करणे आहे. २०१९ मध्ये शंभराहून अधिक पूनर्विवाह लावून दिले. मोबाईल अॅपद्वारे नोंदणी स्वीकारली जाणार आहे. हे काम अविरत सुरु राहणार आहे. या वर्षीच्या पूनर्विवाह परिचय मेळाव्यासाठी ३०० हून अधिक उमेदवारांची ’ं३४१ स्र४ल्लं१ ५्र५ंँ मोबाईल अॅपद्वारे नोंदणी झालेली आहे. संस्थेच्या या अॅपवर सुमारे ८५ टक्के घटस्फोटितांची नोंदणी झालेली आहे. सामाजिक दृष्ट्या ही बाब चिंतेची आहे, पण एक उपाय म्हणून पूनर्विवाह परिचय मेळावा आयोजित केला आहे. असे विवेक जानते आणि उमाकांत कोरे यांनी यावेळी सांगितले.
या मेळाव्यात लिंगायत समाजातील सर्व पोटजातीतील घटस्फोटीत महिला-पुरुष, विधवा, विधूर, परितक्त्या, असे ३०० हून अधिक उमेदवार सहभागी होणार आहेत. सदरील मेळावा हा पूर्णपणे बंदिस्त व मोफत असून उमेदवार व पालक यांनाच फक्त मेळाव्यात प्रवेश असेल, असे नमुद करुन या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन विवेक जाणते व उमाकांत कोरे यांनी केले. या पत्रकार परिषदेस डॉ. प्रभाताई वाडकर, अॅड. जयश्रीताई पाटील, प्रा. दत्तात्रय पत्रावळे, प्रा. डॉ. उर्मिला धाराशिवे आणि उमेश कामशेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.