रेणापूर : शहरासह तालुक्यातील निम्या गावांना पाणी पुरवठा करणा-या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्प क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून कधी मध्यम तर कधी रिमझीम पाऊस झाल्याने चार दिवसांत प्रकल्पात ६ टक्के पाणीसाठा वाढला आहे. सध्या प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
रेणापूर तालुक्यातील जनतेसह, शेतक-यासाठी वरदान ठरलेल्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर शहरासह नऊ खेडी, पानगाव व इतर बाराखेडी, बीटरगावसह पाच खेडी योजना, खरोळा आदीसह निम्या तालुक्याला व अंबाजोगाई तालुक्यातील कांही गावांना येथूनच पाणीपुरवठा केला जातो. गत वर्षी तालुक्यात मृग नक्षत्रात पाऊसाला प्रारंभ झाला.
पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या तालुक्यात पिकांसाठी पोषक पाऊस पडत गेल्याने पिके चांगली बहरली.
सप्टेबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे रेणा प्रकल्प १०० टक्के भरल्याने प्रकल्पाची दारे दोन ते तीन वेळा उघडण्यात आली. रेणा मध्यम प्रकल्पात गतवर्षीचा ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना गेल्या चार दिवसांत रेणापुर शहरासह तालुक्यात कधी मध्यम, तुरळक पाऊस झाल्याने प्रकल्पात ६ टक्यांनी पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी म्हणजे पावसाळा सुरू होऊन एक महिना लोटला तरी तालुक्यात पेरणी व पिकांपुरताच च पाऊस होत आहे. सध्यस्थितीत दमदार पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या व पेरणी करावयाची राहिलेल्या शेतक-याचीचिंंता वाढली होती. यातच गेल्या चार दिवसांपासून कधी तुरळक तर कधी दमदार हजेरी लावल्याने रेणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात सहा टक्के वाढ झाली असून सध्या प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. आणखीन दमदार पावसाची अपेक्षा आहे.