लातूर : प्रतिनिधी
घरगुती गॅस, इंधन, वीज दरवाढीने आधीच देशभरातील जनता पुरती वैतागली आहे. त्यात केंद्र सरकारने आता अनेक जीवनावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ यांच्यावर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करुन जनतेच्या खिशावर आणखी बोजा टाकला आहे. त्यामुळे हा जाचक निर्णय केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सोमवारी केली. अतिवृष्टी व संततधार पावसामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी, असेही ते म्हणाले.
पीठ, पनीर, दही, लस्सी, मध, तांदूळ, गूळ यासारख्या अनेक अन्नधान्यांवर आजपासून जीएसटी लागू झाला आहे. शिवाय, रुग्णालयातील खोली, शैक्षणिक साहित्यही महागणार आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार धिरज देशमुख यांनी केंद्र सरकारचा हा निर्णय सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारा असून तो मागे घेतला जावा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला अनेक व्यापा-यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक मदत, नुकसानग्रस्त शेतक-यांना जिरायतीसाठी प्रती हेक्टर ५० हजार तर बागायतीसाठी १ लाखांची आर्थिक मदत द्यावी. तसेच, वाढीव वीजदराला स्थगिती द्यावी. मागील सरकारच्या विकास योजनांना दिलेली स्थगिती उठवावी, अशा महत्त्वपूर्ण मागण्या काँग्रेस पक्षातर्फे राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.