लातूर : प्रतिनिधी
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या तूलनेत मराठवाड्यात त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यात विजा पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या संदर्भाने संशोधन करुन ‘वीज अटकाव’, या संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. गेल्या आठ दिवसांपासून लातूर जिल्ह्यात बेमोसमी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतक-यांचे प्रचंड मोठे नूकसान झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री रविवारी तातडीने लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर येऊन त्यांनी शेतक-यांच्या नूकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यु पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, लातूर जिल्ह्यात विजा पडून ५ लोकांचा तर १०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. या वादळी पावसाने शेतक-यांचे मोठे नूकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करुन मंगळवारपर्यंत नूकसानीची सर्व माहिती प्रशासनाने पाठवावी. शेतक-यांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल.
विजा पडून मरणा-यांची सर्वाधिक संख्या लातूर जिल्ह्यात आहे. २०२०-२१ मध्ये ११, २०२१-२२ मध्ये १० तर यंदा दोनच महिन्यात ५ जणांना मृत्यू झाला आहे. शंभरपेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. लातूर जिल्ह्यातच सर्वाधिक विजा का पडतात, याअनुषंगाने संशोधन करु, असे पालकमंत्री महाजन म्हणाले. आपल्याकडे यंदा पाऊस उशिरा पडणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. लातूर शहराला चार दिवसाला पाणी पुरवठा होतो. परंतू, वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी विद्यूत तारा तुटल्या, विद्यूत पोल पडले. यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला आहे. हे सर्व ठिक झाल्यानंतर पाणीपुवठा सुरळीत करावा, अशा सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्री महाजन म्हणाले.
- ट्वेंन्टी वन शुगरची २२ कोटीची साखर भिजली
जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने, अतिवृष्टीने सर्वत्र शेतक-यांंचे मोठे नूकसान झाले. निसर्गाच्या या लहरीपणाचा ट्वेंन्टी वन शुगरलाही मोठा फटका बसला आहे. या कारखान्याची शेडमध्ये ठेवलेली साखर पावसाने भिजून साखरेचे पाणी झाले त्यात सुमारे २२ कोटी रुपयांचे नूकसान झाल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले. - जिल्ह्यातील ११६७.५५ हेक्टर क्षेत्र बाधित
गेल्या आठ दिवसातील बेमोसमी पाऊस, वादळ, गारपीट, अतिवृष्टीने लातूर जिल्ह्यातील १७८ गावे बाधित झाली आहेत. १९९६ शेतक-यांचे प्रचंड नूकसान झाले आहे. १४६.८० हेक्टर जिरायती, ३०८.६० हेक्टर बागायती तर ७१२.१५ हेक्टर फळपिकाचे क्षेत्र असे एकुण ११६७.५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच जिल्ह्यात १३ ठिकाणी पडझड होऊन नूकसान झाले आहे. या सर्वांच तातडीने पंचनामे करुन शेतक-यांना मदत दिली जाईल, असे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.