जळकोट: प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अधिनियम २००५ नुसार मागेल त्याला काम या धोरणानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यात जवळपास ३० हजार ग्रामपंचायत क्षेत्रातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची अत्यल्प मानधनावर प्रामाणिक सेवा देणा-या व रोजगार हमी योजनेचा कणा समजला जाणा-या ग्रामरोजगार सेवक, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी, तांत्रिक सहाय्यक अधिकारी व क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर,असे कर्मचारी संपावर गेले आहेत.यामुळे जळकोट तालुक्यातील रोजगार हमी योजनेची कामे ठप्प पडणार आहेत.
तुटपुंजा मानधनावर ग्राम रोजगार सेवक आज स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत परंतु या महागाईच्या काळात आता कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य बनले आहे. आजपर्यंत शासनाने काढलेल्या एकाही शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. मासिक मानधन, प्रवास भत्ता, अल्पोपहार मानधन, सादील खर्च तीन वर्षाचा प्रोत्साहन भत्ता अजून मिळाला नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत मागील दहा ते बारा वर्षांपासून अखंडपणे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेची कामे करीत आहेत. या कर्मचा-यांनी वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली.
मागील वित्तीय वर्षामध्ये पीएम आणि एमएस यांचे मानधन १४ ते १५ हजारने वाढविण्यात आले परंतु कंत्राटी कर्मचा-यांचे मानधन मात्र वाढविण्यात आले नाही, अशा विविध मागण्यांचा विचार न झाल्यामुळे जळकोट पंचायत समितीच्या कर्मचा-यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. सदरील मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी चव्हाण व्ही. टी., घटबाळे व्ही. के, कु. सिंंदगीकर, स्वामी एस. सी. यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती जळकोट यांच्याकडे केली आहे .