औसा : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने लातूर जिल्ह्यासह औसा तालुक्यातील खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये सरकारने केलेल्या तुटपुंज्या मदतीची रक्कमही अर्धाहून अधिक शेतक-यांना मिळाली नव्हती.याबाबत वंचित शेतक-यांना अतिवृष्टीचे अनुदान रक्कम देण्यात यावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर औसा तालुक्यातील ४० हजार ६३१ शेतक-यांच्या खात्यावर २२ कोटी ४१ लाख २१ हजार ६५३ रुपये जमा करण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करीत शेतक-यांना दिवाळी अगोदरच तातडीने मदत देण्याची मागणी सरकारकडे केली होती.मात्र सरकारने झालेल्या प्रचंड नुकसानपोटी तुटपुंज्या मदतीची घोषणा केली.यामध्ये औसा तालुक्यातील ७७ हजार शेतक-यांपैकी केवळ ३४ हजार ७७१ शेतक-यांना २४ कोटी ७३ लाख १३ हजार ३४८ रुपये देण्यात आले.व उर्वरीत शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले होते.
एकंदरीत अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी व शासनाने केलेल्या तुटपुंज्या मदतीची घोषणा करुनही शेतकरी या अनुदानापासून वंचित राहात असल्याने सदरील अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी शासनाकडे केली होती. यानंतर अखेर औसा तालुक्यातील ४० हजार ६३१ शेतक-यांच्या खात्यावर २२ कोटी ४१ लाख २१ हजार ६५३ रुपये जमा झाले आहेत.
खचलेले रस्ते, जमिनीबद्दल अधिवेशनात आवाज उठविणार
जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत अतिवृष्टीमुळे खराब झालेली रस्ते, खचलेली व वाहून गेलेली पुले यांच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून सदर कामांच्या दुरुस्तीसाठी अद्याप निधी मंजूर करण्यात आलेला नाही.सदर निधी मंजूरीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.विधानसभा अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.