शिरूर अनंतपाळ : शहरात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पुढाकारातून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे युवा प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली आहे.
शहरात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा,अशी भावना गेल्या अनेक वर्षापासून शिरूर अनंतपाळकरांतून व्यक्त केली जात होती.अखेर राष्ट्रवादीच्या वतीने युवा नेते सुरज चव्हाण यांच्या पुढाकाराने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर झाल्याने सर्व स्तरांतून आनंद व्यक्त केले जात आहे. दरम्यान शहरातील बसवेश्वर चौकात दि.२८ मे शनिवारी सुरज चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित राष्ट्रवादीच्या जिल्हा मेळाव्यात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यात राज्यमंत्री बनसोडे यांनी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले होते.
त्या अनुषंगाने अवघ्या तीन दिवसांतच शहरातील पुतळा उभारणीसाठी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरवण्यिासाठी सहाय्य या योजनेअंतर्गत २५ लाखांंचा निधी मंजूर करण्यात आला असून या पुतळा उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गंत करण्यात येणार असल्याचे ही सुरज चव्हाण यांनी सांगितले.