लातूर : आज देशात धर्माधर्मात जाती-जातीत द्वेषभावना जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशात अशांतता भीतीचे वातावरण दिसून येत आहे. तसेच आज संपूर्ण देश दंगलीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज समाजात सर्वसमावेशक संघटना निर्माण करुन देशात सलोखा निर्माण करण्याऐवजी जातीला समाज हे गोंडस नाव देऊन जातीच्या संघटना निर्माण करुन त्या भक्कम केल्या जात आहेत. ही परिस्थिती पाहता सम्यक समाज संघाने देशभरात ७५ संविधान सन्मान परिषदा घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डॉ. सुरेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सुरेश वाघमारे यांनी महाराष्ट्रातील डॉक्टर, प्राध्यापक, वकील, कार्यकर्ते यांच्याशी संपर्क केला व दि.३१ मे २०२२ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हॉटेल मानस, लातूर येथे महाराष्ट्रातील विविध भागातील प्राध्यापक, डॉक्टर, वकील व कार्यकर्त्यांची बैठक बोलावून या बैठकीत चर्चा होऊन सम्यक समाज संघ या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर पंच्यात्तर संविधान सन्मान परिषदांचे आयोजन करण्यात आले असून पहिलीच संविधान सन्मान परिषद २६ जून २०२२ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केली जाणार आहे, तर १५ ऑगस्ट २०२२ रोजी लातूर येथे दुसरी संविधान सन्मान परिषद होणार आहे.
या बैठकीतच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अॅड. मंचकराव डोणे यांची, प्रदेश महिला आघाडी प्रमुख म्हणून मनीषा तोकले यांची तर महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक म्हणून अनिल म्हमाने कोल्हापूर यांची निवड करण्यात आली तसेच डॉ. पी. जी. जोगदंड, मुंबई विद्यापीठ डॉ. प्रदीप आगलावे नागपुर, डॉ. संजय कांबळे पुणे, नितीन चव्हाण धुळे, किरण सगर उस्मानाबाद आदींची प्रमुख सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.