34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरऔराद शहाजानी येथे वाळूमाफीया जोमात

औराद शहाजानी येथे वाळूमाफीया जोमात

एकमत ऑनलाईन

निलंगा (लक्ष्मण पाटील) : तालुक्यातील औराद शहाजानी येथील तेरणा व मांजरा नदीच्या संगमातून वाळूमाफीयांनी महसूल प्रशासनासोबत तोडपानी करून राजरोसपणे दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसा करण्याचा गोरख धंदा सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही वरिष्ठ अधिकारी गप्प आहेत. या वाळू माफियांना अभय कुणाचे ? असा सवाल शेतक-या­यासह नागरिकातून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अवैध वाळूमाफियांवर कारवाई करावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

निलंगा तालुक्याला तेरणा व मांजरा या दोन नद्या लाभल्या आहेत. या नद्यांचा संगम औराद शहाजनी येथील महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर झालेला आहे. या नदयांच्या स्थानिक संगमातून महसूल प्रशासनाशी हातमिळवणी करून गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पोकलेन लावून शेकडो ट्रॅक्टर व टिप्परने राजरोसपणे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात आहे. वाळू माफियाकडून अवैद्य वाळू उपसा करून वाहतूक करीत असताना नदीकाठच्या शेतक-यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर नुकसानीबाबत शेतक-यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांच्यासोबत दमदाटी करून बिनदिक्कतपणे वाहतूक केली जात आहे. याबाबत शेतक-यांनी प्रशासनाकडे धाव घेतली असता प्रशासन त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतक-यातून प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत कार्यवाही करण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासन तोडपाणीमुळे मूक गिळून गप्प आहे . तर तालुक्याचे महसूल विभागाचे अधिकारीही कार्यवाई करण्यासाठी येत असताना खब-यामार्फत कळविले जात असल्याने अधिकारी पोहचेपर्यंत सर्वत्र कमालीची शांतता दिसते. अधिकारी येत असल्याची कुणकुण वाळूमाफियांना लागत असल्याने ते नदी काठी येईपर्यंत टिप्पर व ट्रॅक्टरचे ताफे लंपास होतात आणि एखादा गरीब मात्र माहिती नसल्याने त्यांच्या जाळ्यात सापडत. संबंधित अधिकारी त्यातच धन्यता मानून कार्यवाई केल्याचा आव आणत कार्यालय गाठतात.

शेकडो ट्रेकटर व टिप्पर अवैध वाळू उपसा करीत असताना अधिका-यांंना एखादा ट्रेकटरवाला सापडतो आणि इतर सर्व जण सही सलामत सुटतात. तसेच कार्यवाही करण्याकरीत अधिकारी येत असल्याची माहिती वाळू माफियांना तात्काळ समजत असेल तर हा कार्यवाहीचा फार्स कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिकारी गेले की अर्ध्या तासात सर्व वाळू माफिया एकत्र येऊन पुन्हा राजरोसपणे अवैध वाळू उपस्यास सुरुवात करतात. अधिकारी आमच्या सोबत असल्याने आमचे कोणीही कांहीही करू शकत नसल्याचे बिनधास्तपणे वाळूमाफियातून बोलले जात आहे.

माफीया-महसूल विभागाचे संगणमत?
स्थानिक ते तालुका महसूल प्रशासनासोबत वाळूमाफियांचे साटेलोटे असल्याने औराद शहाजानी येथे वाळूमाफियांनी डोके वर काढले असून यामुळे पोलीस प्रशासनही हतबल झाले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. तालुका महसूल विभागाचे वाळूमाफियांसोबत संगनमत झाल्याने जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज यांनी तात्काळ लक्ष देऊन निलंगा तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करावा अशी शेतक-यासह नागरिकांतून मागणी होत आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही अधिका-याला कोरोनाची लागण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या