चाकुर : गेल्या आठवड्यापासून संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पीके धोक्यात आली असून शेतकरीचिंंताग्रस्त झाले आहेत. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सर्वदूर चांगला पाऊस झाला, त्यामुळे बळीराजा सुखावला त्याने चाढ्याावर मुठ धरली आणि काळ्या आईची ओटी भरली आहे. पीके चांगली आली माञ गोगलगायी आणि पैसा कीड याचा प्रादुर्भाव झाला आहे .त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.
त्यात गेल्या आठ दिवसांपासून संततधार पावसामुळे तर सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे.शेतात सर्वञ पाणीच पाणी झाले आहे. बळीराजा’ऊन, पाऊस, थंडी, वारा या कशाचीही भिती न बाळगता मेहनत करीत असतो. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ हा बळीराजाच्या पाचवीलाच पुजलेला आहे. याची जाणीव बळीराजालाही आहे. परंतु दुष्काळ हा कोरडा असो की ओला, अशा कोणत्याही संकटांना न डगमगता आपल्या काळ्या आईवर ठाम विश्वास ठेवून ऊधारी ऊसनवारीसह वेळप्रसंगी सावकारी कर्ज घेऊन खत-बियाने घेऊन आपल्या अर्धांगिनीसह घरातील सर्वच सदस्यांना सोबत घेऊन सोयाबीन लागवड करतो. आणि ज्वारी, मूग, उडीद, तीळ व कारळ या पिकांची पेरणी करतो.
भविष्यात उद्भवणा-या संकटांशी दोन हात करण्याचे सामर्थ्य आपल्या दणकट मनगटात ठेवतो. खरी कसरत अल्पभूधारक शेतक-यांचीच आहे. उत्पादन कमी, आणि खर्चा अधिक अशी अवस्था झाली आहे. या खरीप हंगामात बि-बीयाणे यांच्याकिंमती आकाशाला भिडल्या होत्या. रासायनिक खत पोते दोन हजार रुपये तर सोयाबीन बीयाणे पिशवी चार हजार रुपये झाली होती. रोजगाराच्या रोजंदारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. चाकूर तालूक्यात आतापर्यंत पडलेला पावसाचे प्रमाण पाहता मंडळ निहाय-१२ जुलैचा पाऊस तसेच कंसातील अकडेवारी एकूण पावसाची आहे. यात चाकूर-०८ (३३०), नळेगाव-०८ (२६५), वडवळ -०६ (४०२) झरी बु.- १० (३९१), शेळगाव-०७ (५२३), आष्टा-०८ (३००) अशी एकूण ४७ मिमी तर सरासरी ७..८३ पावसाची नोंद झाली आहे. एकूण पाऊस २२११.०० (मिमी), एकूण सरासरी (३६८ (मिमी) असा पाऊस झाला आहे.