लातूर : प्रतिनिधी
वृक्षारोपण करुन प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. आधीच वातावरणातील बदलामुळे जागतिक समस्या उभ्या टाकल्या आहेत. वृक्ष नसतील तर पावसाबरोबरच अनेक समस्या उद्भवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेतील आठ शाळांनी लावलेल्या २१०० वृक्षांचा वाढदिवस निमित्त आयोजित वन महोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल बोलत होते. यावेळी कवी अरविंद जगताप यांची झाड आहे तर आपलीसुद्धा वाढ आहे ही कविता सुपर्ण जगताप यांनी विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतली. निसर्ग, वृक्ष वेली, पर्यावरणाची जाणीव व्हावी म्हणून राजस्थान शिक्षण संस्थेच्या परीसरात आठ शाळांमध्ये सह्याद्री देवराई व लातूर वृक्ष चळवळतर्फे बी बँक आणि वृक्ष बँक स्थापन करण्यात आली. आणि सर्व आठही शाळांच्या माध्यमातून वृक्ष चळवळ रुजवण्यात आली. या परीसरात घनदाट वन आणि दुतर्फा असे २१०० वृक्षांचा सुंदर परिसर निर्माण झाला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते या सगळ्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि ५१ नवीन झाडे देखील लावण्यात आली. यावेळी सह्याद्री देवराई लातूरचे सुपर्ण जगताप व डॉ. बी. आर. पाटील यांचादेखील राजस्थान शिक्षण संस्थेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव आशिष बाजपाई, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपाणी, संस्थेचे सदस्य चैतन्य भार्गव, आशिष अग्रवाल, रवींद्र वोरा, हुकूमचंद कलंत्री, सहाय्यक आयुक्त रामदास कोकरे, तालुका वनाधिकारी सचिन रामपुरे, गणेश हेड्डा, कमलकिशोर अग्रवाल, आनंद लाहोटी तसेच संस्थेच्या शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.