लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाची मोठी परंपरा आहे. वारक-यांसाठी पंढरपूरचा विठ्ठल अतिशय महत्वाचा असून आषाढी एकादशी हा त्यांच्यासाठी मोठा सण असतो. या एकादशीच्या निमित्ताने केवळ राज्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागातील वारकरी आणि भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतोे. लातूर जिल्ह्यातूनसुद्धा हजारो वारकरी पंढरपूरसाठी जात असतात. या वारक-यांकरीता सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून वारक-यांच्या रुपात विठ्ठलाची सेवा करण्याचे भाग्य सत्संग प्रतिष्ठानमुळे आम्हालाही प्राप्त झाल्याचे उद्गार प्रसिद्ध उद्योजक दिलीप माने यांनी केले.
लातूरातील सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणा-या वारकरी भाविकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात येते. या उपक्रमाच्या २२ व्या वर्षी तब्बल पंचवीस २५ बससेच्या माध्यमातून सत्संग प्रतिष्ठानने वारक-यांना पंढरपूरला रवाना केले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात दिलीप माने बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारीख, डॉ. चेतन सारडा, सुरेश रिणुवा, वाहतुक पोलीस निरीक्षक बिर्ला, बन्सल क्लासेसचे कुलकर्णी, सत्यनारायण लड्डा, प्रतिष्ठानचे सचिव चंदुसेठ लड्डा, एस. टी. महामंडळाचे युवराज थडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाडा ही संताची भुमी म्हणून ओळखली जात असल्याचे सांगत दिलीप माने यांनी या भुमितून वारकरी सांप्रदायाची पताका फडकवत ठेवण्याचे काम होत आहे. वारक-यांसाठी पंढरपूरचा विठ्ठल हे श्रद्धास्थान असून आषाढी एकादशी ही या वारक-यांसाठी मोठा उत्सव असतो. त्यामुळेच मराठवाड्यातून हजारो वारकरी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. या वारकरी भाविकांची सेवा व्हावी आणि त्यांचा पंढरपूरचा प्रवास सुखकर व्हावा याकरीता सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने गत २२ वर्षापासून मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येते. या उपक्रमात आपल्यालाही सहभागी होण्याचे भाग्य प्राप्त झाले असल्यामुळे वारक-यांच्या रुपात साक्षात विठ्ठलाची सेवा सत्संग प्रतिष्ठाकडून आणि आमच्याकडून आगामी काळात व्हावी, अशी प्रार्थना पंढरपूरला जाणा-या वारकरी भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी करावी, असे आवाहन दिलीप माने यांनी यावेळी केले.
सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारीख यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या वतीने मागील काळात आयोजीत केलेल्या विविध सांकृतिक आणि सांप्रदायीक कार्यक्रमाची माहिती देऊन याप्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्कार आणि सेवाभाव जोपासण्यासाठी सातत्याने प्रयत्न करुन त्यासाठी आवश्यक असणारा पुढाकारही घेण्यात येत असल्याचे सांगितले. केवळ पंढरपूरला जाणा-या वारक-यांसाठीच नव्हे तर तिरुपतीला जाणा-या भाविकांसाठीसुद्धा प्रतिष्ठानच्या वतीने वाहन सेवा उपलब्ध करुन देण्यात येते, असे सांगून आगामी काळातही हे सेवाकार्य अशाच पद्धतीने सुरु राहिल अशी ग्वाही यावेळी दिली.
याप्रसंगी सुरेश रिणुवा, डॉ. चेतन सारडा, मीरा लड्डा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात वारक-यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाम मुंदडा, द्वारकादास मंत्री, मधुसुदन पारीख, नितीन मालू, ओमप्रकाश मुंदडा, जयश झंवर, बालाजी बारबोले, पुरुषोत्तम नोगजा, प्रकाश आग्रोया, नंदकिशोर लोय्या, संजय जाजू-नांदेड, सुंदरलाल दरक, अशोक गोविंदपूरकर, दत्ता लोखंडे, रमेश भुतडा, अशोक चांडक आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.