22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeलातूरपंच मातांचा सत्कार म्हणजे सत्यम शिवम सुंदरम

पंच मातांचा सत्कार म्हणजे सत्यम शिवम सुंदरम

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी आज पंच कन्यांचा नाही तर पंच मातांचा सत्कार होतांना आनंद होत आहे. ज्ञान हे सर्वात महत्वाचे असून ते सत्यम शिवम सुंदर असते. या मातांनी आपल्या कार्यातून हे ज्ञान दाखवून दिले आहे. तसेच संपूर्ण जगात एकोपाचा संदेश देण्यासाठी रामेश्वर या गावाचा आदर्श जगात पोहचविणे गरजेचे आहे’असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मांडले.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे रामेश्वर (रुई) येथे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या नवव्या पुण्यस्मरण स्मृतिदिनाचे औचित्य साधून, समाजासमोर आदर्श निर्माण करणा-या पंचकन्यामध्ये, संत साहित्याच्या गाढया अभ्यासक कृष्णा कश्यप, ज्येष्ठ समाजसेविका शशिकला भिकाजी केंद्रे, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकर, आपुलकी संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. ललिता शरद गुप्ते आणि ज्येष्ठ समाजसेविका लक्ष्मीबाई महादु शेळके यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख २१ हजार रूपये प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चाकूरकर बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे अध्यक्षस्थानी होते. या वेळी ह.भ.प. तुळशीराम कराड, काशीराम कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, आमदार रमेश कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, कमल राजेखाँ पटेल, डॉ. हनुमंत कराड, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर व राजेश कराड हे उपस्थित होते.

देशात ज्या प्रकारे चांगल्या गोष्टी आहेत तशाच वाईट पण आहेत. सध्या देश जाती आणि धर्माच्या बंधनात अधिक अडकलेला दिसतो. मानवाला सुखी जीवन जगायचे असेल तर देशात चांगली परिस्थिती निर्माण होणे गरजेचे असल्याचे सांगून चाकूरकर म्हणाले की, माझ्या ४८ वर्षाच्या राजकारणाच्या प्रवासात जगातील सर्व धार्मिक स्थळांना भेट दिली. त्यामध्ये रामेश्वर येथील राम मंदिरातील मूर्त्यां या सर्वात सौदर्यवान आहेत. सौदर्य काय असते हे मूर्त्यांच्या डोळ्यात पाहिल्यावर कळते. सौदर्य हा सत्याचा भाग आहे. जेथे सत्य प्रकट होते तेथेच मनामध्ये पवित्र भावना निर्माण होते. ही भावना धार्मिक स्थळांवर गेल्यावर कळते. डॉ. विश्वनाथ कराड यांनी त्यांच्या गावी हिंदू-मुस्लिमांचा नाही तर वैचारिक पूल निर्माण करून एकतेचे मोठे कार्य केले आहे. कोणी ही असो त्याला धर्माची भावना मोठी असते. परंतू चांगुलपणा एकटयामुळे नाही तर घरातील सर्व सदस्यांमुळे येत असतो.

यावेळी राहुल कराड, डॉ. मंगेश कराड, आमदार रमेश कराड यांनी अक्कांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत सर्वांना भाऊक केले. तसेच सर्व पुरस्कार्थीयांनी आपले मनोगत व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. हनुमंत कराड यांनी आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या