शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : शिरूर अनंतपाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या सर्व सतरा जागेचा निकाल लागला. भाजपाने नऊ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली असून भाजपा शहराध्यक्षांना पराभवाचा धक्का बसल्याने भाजपाचा गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली आहे.पहिल्यांदाच एंट्री करत राष्ट्रवादी तीन जागा तर शिवसेना चार जागा जिंकत चांगलीच मुसंडी मारली आहे. काँग्रेसने एक जागा जिंकत खाते उघडले आहे.
या निवडणुकीत भाजपा शहराध्यक्ष अॅड.गणेश सलगरे,माजी नगरसेवक सुमतीनंदन दुरुगकर,विशाल गायकवाड यांना तर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अशोक कोरे,अविनाश अचवले,राष्ट्रवादीचे डॉ.उद्धव गायकवाड या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला.तर काँग्रेसचे सुधीर लखनगावे,राष्ट्रवादीचे तांदळे,संभाळे, बाळू शिवणे शिवसेनेचे अनंत काळे, शिवणे, आवाळे, खरटमोल यांनी पदार्पणातच विजय मिळविला आहे.
दरम्यान माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,अॅड संभाजीराव पाटील, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी गेल्या पाच वर्षात शहरात केलेल्या विकास कामाच्या मुद्यावर निवडणुक लढवली.भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी पुर्ण प्रचार यंत्रणा लावली होती.तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे प्रदेश युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण ही या निवडणुकीसाठी शहरात ठाण मांडून बसले होते.शिवसेना नेत्या डॉ. शोभाताई बेंजरगे यांच्या सहकार्याने भाजपाला कडवी झुंज देत आठ जागा जिंकून चांगले यश संपादन केले.
शिरूर अनंतपाळ नगरपंचायत निर्मिती नंतर झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपा व महाविकास आघाडीच्या घटक पक्षात अत्यंत चुरशीची निवडणुक झाली.यात सतरापैकी नऊ जागा भाजपाला तर महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळाला.एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिल्याने एक हाती सत्ता असलेल्या भाजपाने काठावर बहुमत मिळवित सत्ता राखली आहे.