19.1 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home लातूर श्री केशवराज विद्यालयात 'माझी आई जगातील पहिले विद्यापीठ' हा कार्यक्रम संपन्न

श्री केशवराज विद्यालयात ‘माझी आई जगातील पहिले विद्यापीठ’ हा कार्यक्रम संपन्न

एकमत ऑनलाईन

लातूर: येथील श्री केशवराज विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित “सन्मान स्त्री कर्तृत्वाचा” या उपक्रमांतर्गत ‘माझी आई जगातील पहिले विद्यापीठ’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून साहित्यिका सौ.अनिता येलमटे तर अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ.साधना शिंदे या लाभल्या होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती उद्योजिका माननीय सौ. वर्षाताई शेटे यांची होती. ‘माझी आई जगातील पहिले विद्यापीठ’ या विषयावर मांडणी करताना अनिता ताईंनी स्त्रीमधील प्रचंड मातृ शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय समाजव्यवस्थेतीलअत्यंत महत्वपूर्ण बलस्थान म्हणजे कुटुंब व्यवस्था.या कुटुंबाचे दोन महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणजे माता आणि पिता.सदैव बदलत जाणाऱ्या जगात मनुष्याच्या वाढत चाललेल्या प्रचंड महत्वकांक्षा यावरून भविष्यात जग विनाशाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.मानव वंश संपुष्टात येईल की काय? अशी भीती सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे. अशा अवस्थेत मानव वंश टिकवून ठेवायचा असेल तर कुटुंबव्यवस्था टिकून राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वरचेवर संवेदनाहीन होणारा समाज संवेदनशील बनवायचा असेल, तर स्त्रीने जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संवेदनशील समाज एक स्त्रीच निर्माण करू शकते. कारण विद्यापीठा सारखी व्यापकता स्त्रीमध्ये आणि तिच्यामध्ये असलेल्या मातृत्वा मध्येच पाहायला मिळते.येणाऱ्या पिढीला आपला कर्तृत्वसंपन्न इतिहास कळला पाहिजे.

मातृत्व हेच पूर्णत्व असल्याची जाणीव प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण झाली पाहिजे.आईच्या सहवासातच मुलांची जडणघडण होत असते. आईच्या विचारांचा प्रभाव मुलांवरती पडत असतो.आई मधील मातृत्व हेच बालकाच्या जीवनाला योग्य दिशा देणारे असते.मातृत्व भाव हा प्राणी जाती व मानव जाती यांच्यामध्ये समान स्वरूपात पहायला मिळतो.मांजर, वानर,सिंहिंण यांच्यामधील उदात्त मातृभावाची उदाहरणे त्यांनी दिली. त्याचबरोबर विविध महापुरुषांच्या जीवनावर त्यातही संत ज्ञानेश्वर,साने गुरुजी,स्वामी विवेकानंद ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज अब्राहम लिंकन खलील जिब्रान इत्यादी महापुरुषांच्या जडणघडणीमध्ये मातृ शक्तीचे अस्तित्व कशाप्रकारे होते हे पटवून दिले.बदलत्या जगात एक माता म्हणून आपणही आपल्या मुलांवर विविध प्रकारचे संस्कार करून, त्यांना बदलत्या जगासोबत जगायला शिकवणे, त्यांच्या पंखांना बळ देणे आवश्यक ठरते.

भारतीय समाजाचे वैशिष्ट्य असणारी कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न एक माताच करू शकते.तिच्यामधील मातृशक्तीला वंदन करून मातृशक्ती जागृत करण्याचा प्रयत्न ताईंनी केला. याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करत असताना सौ.साधना शिंदे यांनी आई मुलांचा आरसा असते, आई व मूल यांच्यामधील नातं हे मैत्रीपूर्ण असलं पाहिजे, असे आपले मत त्यांनी व्यक्त केले.विविध उदाहरणांद्वारे स्त्रीशक्तीला जागरूक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी रुईकर यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती मीरा चामवाड यांनी मांडले.तरआभार श्रीमती वनमाला कलूरे यांनी मानले. वैयक्तिक पद्य श्रीमती कांचन तोडकर यांनी सादर केले व शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

मांजरा धरण 96% भरले; मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या