ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून दाखविण्याची हिम्मत असेल तर काहीही होऊ शकते हे कपीलने दाखवून दिले आहे. दहा वर्षांपूर्वी कपिलने फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी गाव सोडले आणि सध्या तो अनेक मराठी मालिकांमधून काम करतो आहे. त्याला सध्या अनेक दिग्दर्शकाकडून काम करण्यासाठी बोलावणे येत आहे.
अभिनेता कपिल त्यांचे वडील भारत होनराव हे पंचायत समितीचे माजी उपसभापती होते. त्यांचा मूळ व्यवसाय शेती हाच आहे. कपिलला शालेय वयापासूनच अभिनयाची आवड होती. कलाकार व्हावे अशी त्याची इच्छा होती. दहावीपर्यंत शिक्षण त्यांनी उदगीर येथे पूर्ण केले आणि वयाच्या आठव्या वर्षी तो मुंबई येथे अभिनयाचे काम करण्यासाठी गेला. परंतु कपिलने अभिनयाचे कसलेही धडे घेतले नव्हते. परंतु ‘केल्याने होत आहे रे ते आधी केलेच पाहिजे,’ या म्हणीप्रमाणे जिद्द सोडली नाही. शेवटी मुंबईच्या विविध नाट्य संस्थांमधून त्याने अभिनयाचे धडे घेतले.गत आठ ते दहा वर्षांपासून त्याने वीस नाटकांमधून काम केले आहे तसेच तीन चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारली आहे तसेच त्याने अनेक मराठी मालिकांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
स्टार प्रवाह मधील ‘लक्ष’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘ललित २०५’ या मराठी मालिकांमधून काम केले आहे तसेच आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. कलर्स मराठी वरील ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय हो’, या मालिकेमध्ये त्यांनी काम केले आहे. कपिल यास २०१५ मध्ये मराठी मालिकेमध्ये मुख्य नायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ‘मर्मबंधातील ठेव’ ही आठवड्यातून दोन सायंकाळी साडेचार वाजता सह्याद्री वाहिनीवर दाखवली जायची.
यानंतर मार्च महिन्यामध्ये कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाले. यामुळे फिल्म इंडस्ट्री मध्ये काम मिळेल की नाही त्याचा विश्वास नव्हता यामुळे तो गावाकडे आला आणि यापुढे आपल्याला काम मिळणार नाही आता गावाकडेच कुठलातरी व्यवसाय करू, असा विचार तो करीत असतानाच एकेदिवशी कोठारे व्हिजनच्या महेश कोठारे यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला आम्ही एक मालिका करतोय यासाठी तुझी ऑडिशन पाठव लगेच कपीलने आपल्या मोबाईलवरुन ऑडिशन पाठवली, लागलीच दुस-या दिवशी कपिला फोन आला की तुझी मालिकेत निवड झाली आहे हे तू लगेच मुंबईसाठी निघ, लॉकडाउन होते व जिल्हा बंदी होती यामुळे लातूर ते मुंबई पास काढून कपिल मुंबई येथे गेला.
कपिलला ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या मोठ्या मुलाची भूमिका मिळाली आहे या मालिकेत कपिलचे नाव मल्हार शिर्केे पाटील असे आहे तो पैलवान आहे त्याने आपल्या यशाचे श्रेय दिग्दर्शक चंद्रकांत कणसे निर्माता महेश कोठारे, आदिनाथ कोठारे यांना दिले आहे.
१० वर्षांचे फळ आता मिळाले
मुंबई येथे गेले असताना आपणास अनेक अडचणी आल्या. ग्रामीण भागातून असल्यामुळे खूपच अडचणी आल्या भाषेची अडचण आली, अनेकदा नाटकामधून काढून टाकण्यात आले, असे असले तरी छोटे-मोठे कामे मिळत गेली. दिग्दर्शक शाम बागोकर यांनी मला मर्मबंधातील ठेवी या मालिकेत काम करण्याची संधी दिली. त्यांनी खूप सांभाळून घेतले.
आता अनेक वर्षानंतर मला एका चांगल्या मालिकेतून काम करण्याची संधी मिळाली आहे, दहा वर्षांनंतर आता यश मिळत आहे. सुरुवातीला वडिलांचा विरोध होता परंतु यानंतर मात्र आई-वडिलांनी दोघांनी सहकार्य केले. सुख म्हणजे काय असतं या मालिकेत आपण काम करीत असून स्टार प्रवाह वर रात्री साडेनऊ वाजता ही मालिका दाखविण्यात येत आहे. आता याच क्षेत्रावर भर द्यायचा आहे.
-कपील होनराव
(अभिनेता)