लातूर : प्रतिनिधी
लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान प्राचीन काळातील असून याची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातसुद्धा पसरलेली आहे. देवस्थान परिसाराचा विकास होऊन त्याचे सुशोभिकरणासाठी विकास आराखडा तयार करण्यात आलेला असून या आराखड्यास निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने यात्रा महोत्सव पार पडत आहे. या महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृषीव पशु प्रदर्शनाच्या शुभारंभ कार्यक्रमास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आले होते.
यावेळी जिल्हाधिका-यांनी प्रथम ‘श्री’चे दर्शन घेऊन महापुजा केली. यानंतर आयोजित देवस्थान विश्वस्ताच्या बैठकीत ते बोलत होते. शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा विकास व्हावा अशी मागणी सातत्याने देवस्थान विश्वस्ताच्या वतीने होत आहे. या मागणीबाबत गांभीर्याने विचार होऊन या बाबत आवश्यक असणारा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या विकास आराखड्यासाठी लागणारा निधी शासनाच्या पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लवकरच मंजूर करण्यात येईल, असा विश्वास देऊन त्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सिद्धेश्वर देवस्थान प्राचीन कालीन असून या ठिकाणी जुना शिलालेख सुद्धा आहे.
देवस्थानची माहिती त्याचबरोबर शिलालेखाबाबत असणारी माहिती एकत्रीत करुन याची एक पुस्तीका तयार करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करुन देवस्थान परिसरात या संदर्भातील एक संग्रालय सुद्धा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे जिल्हाधिर्कायांनी सांगितले.यावेळी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, ज्येष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, यात्रा प्रमुख तथा विश्वस्त अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, पशु संवर्धन विभागाचे डॉ. पडिले, डॉ. बुकशेटवार, विशाल झांबरे आदींची उपस्थिती होती.