लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात आजनही खरीपाच्या पेरणी योग्य दमदार पाऊस न झाल्याने व जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने जिल्हयात आज पर्यंत केवळ ३७.६२ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. अनेक तालुक्यात समविषम स्वरूपात पाऊस पडत असल्याने अजूनही खरीपाच्या पेरणीला वेग आला नाही. जिल्हयात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्या परिसरातील शेतक-यांना खरीपाच्या पेरणीसाठी मोठया पावसाची प्रतिक्षा आहे.
जिल्हयात आजपर्यंत १४७ मिलीमिटर पाऊस झाला आहे. या पावसाच्या जोरावर शेतक-यांनी चाढयावर मूठ धरली आहे. यात लातूर तालुक्यात १२ हजार ५१७ हेक्टरवर, रेणापूर तालुक्यात १३ हजार २०८ हेक्टरवर, औसा तालुक्यात ६ हजार ४०० हेक्टरवर, अहमदपूर तालुक्यात ५५ हजार ७४० हेक्टरवर, निलंगा तालुक्यात १२ हजार ७७७ हेक्टरवर, निलंगा, शिरूर अनंतपाळ तालुक्यात १४ हजार ७०९ हेक्टरवर, उदगीर तालुक्यात २३ हजार ९६१ हेक्टरवर, जळकोट तालुक्यात २३ हजार ९६१ हेक्टरवर, देवणी तालुक्यात २० हजार ३१६ हेक्टरवर, चाकूर तालुक्यात २७ हजार ७५० हेक्टरवर तूर, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस आदी पिकांचा पेरा झाला आहे. जिल्हयात दमदार पाऊस न झाल्याने आजही लातूर, औसा, निलंगा, रेणापूर तालुक्यातील पेरण्या पावसाभावी खोळंबल्या आहेत.
लातूर जिल्हयात ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टरवर पेरणी होणार आहे. जिल्हयात कमी-जास्त स्वारूपात पाऊस पडत आहे. या पावसाच्या आधारवर २ लाख ३० हजार ३७९ हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा १ लाख ८३ हजार ६६५ हेक्टवर झाला आहे. त्या खालोखाल तुरीचा ३१ हजार ३९९ हेक्टरवर, मूगाचा ३ हजार ९८ हेक्टरवर, उडीदाचा २ हजार ७० हेक्टरवर, साळीचा ४९ हेक्टरवर, ज्वारीचा ३ हजार २२१ हेक्टरवर, ५० हेक्टरवर बाजरी, मकाचा ९६२ हेक्टरवर, तीळ ११४ हेक्टरवर, भुईमूग ८० हेक्टरवर, कारळ ७७ हेक्टरवर, तर २ हेक्टवर सुर्यफुलाचा पेरा झाला आहे. तसेच ५ हजार ४९८ हेक्टरवर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.
जिल्हयात १४७ मिलीमिटर पाऊस
लातूर जिल्हयात दि. १ जुलै पर्यंत १४७ मिलीमिटर पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक अहमदपूर तालुक्यात २१८.६ मिलीमिटर पाऊस झाला आहे. त्या खालोखाल २१५.५ मिलीमिटर पाऊस उदगीर तालुक्यात झाला आहे. जळकोट तालुक्यात १९९.९ मिलीमिटर पाऊस, चाकूर तालुक्यात १९३.२ मिलीमिटर पाऊस, शिरूर अनंतपाळ तालुक्यात १९१.३ मिलीमिटर पाऊस, रेणापूर तालुक्यात १४७.६ मिलीमिटर पाऊस, देवणी तालुक्यात १४०.५ मिलीमिटर पाऊस, लातूर तालुक्यात १२०.१ मिलीमिटर पाऊस, औसा तालुक्यात ६७.३ मिलीमिटर पाऊस झाला आहे.