24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरजिल्हा बँकेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन

जिल्हा बँकेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कल्पवृक्ष आहे. या कल्पवृक्षाच्या सावलीखाली लाखो कुटूंब आहेत. त्यामुळे जिल्हा बँक ही सावकारी नसून ती सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत आहे. शेतक-यांच्या चेह-यावर आनंद दिसला पाहिजे, यासाठी जिल्हा बँक विविध योजनेतून गेल्या २५ वर्षापासून सतत प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांनी केले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३९ व्या सर्वसाधारण सभेत सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, गणपतराव बाजूळगे, रवी काळे, संचालक श्रीपत काकडे, पृथ्वीराज शिरसाठ, अशोक गोविंदपूरकर, जयेश माने, दिलीप पाटील नागराळकर, भगवानराव पाटील तळेगावकर, व्यंकटराव बिरादार, अनुप शेळके, अशोकराव पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उस्मानाबाद जिल्हा बँकेतून लातूर जिल्हा बँकेचे १९८४ रोजी विभाजन झाले. विभाजनानंतर जिल्हा बँकेने पहिल्यांदा साडेसात कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. तर आज जिल्हा बँकेने साडेसतराशे कोटी रुपयांचे कर्ज शेतक-यांना वाटप केले. तेही बिनव्याजी, असे असतानाही जिल्हा बँकेचा निवळ नफा ११ कोटी पेक्षा जास्त राहिला आहे. शेतक-यांना कोणाकडे शेती गहाण ठेवण्याची गरज नाही. कारण जिल्हा बँक शेतक-यांना त्यांच्या मागणीनुसार उच्च शिक्षण कर्ज योजना, मुलींच्या विवाहसाठी शुभमंगल कर्ज योजना आदी साठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतक-यांच्या चेह-यावर आज आनंद असल्याचे सांगून मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख म्हणाले की, जिल्हा बँकेच्या ग्राहकांना कोरोना काळात पगाराचे पैसे घरपोच वाटप केले. सहकार क्षेत्रात जिल्हा बँकेने भरारी घेतली असताना मांजरा परिवारही मागे नाही. मांजरा परिवारातील कोणत्याही साखर कारखान्याची आज एफआरपी थकीत नाही. सर्वसामान्य मानसाला केंद्रबिंदू माणून व सर्व सहकार्यांना सोबत घेऊन काम करत आहोत., असे ते म्हणाले.

यावेळी आमदार पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेची वाटचाल पाहता चांगल्या प्रकारचा प्रशासक म्हणून
सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्याकडून शिकावे. त्यांच्याकडे पाहूनच आमचीही वाटचाल करत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी अशोक पाटील निलंगेकर, अशोक गोविंदपूरकर यांनी आपले विचार मांडले. तसेच या सभेत सर्व विषयांच्या ठरावांना संचालकांनी टाळयांच्या गजरात मान्यता दिली. यावेळी मारोती पांडे, एन. आर. पाटील, राजकुमार पाटील, मनोज पाटील, नारायण लोखंडे, संचालिका श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, संचालिका सौ. स्वयंप्रभा पाटील, संचालिका सौ. सपना किसवे, सौ. अनिता केंद्रे, सुनील कोचेटा, सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक हणमंत जाधव यांनी केले. आभार अ‍ॅड. प्रमोद जाधव यांनी मानले.

जिल्हा बँक सर्वांची आधार स्तंभ

उस्मानाबाद जिल्हा बँकेतून लातूर जिल्हा बँक वेगळी झाल्यानंतर आपल्या भागातील लोकांना न्याय देण्याचे काम लातूर जिल्हा बँकेने केल्यामुळे ती आपल्या सर्वांची आधार स्तंभ आहे. सुरुवातीला ११ कोटी रुपयांची असलेल्या जिल्हा बँकेचे भांडवल १ कोटीचे होते. ते आज ३ हजार ५०० कोटीवर गेले आहे.

जिल्हा बँक ही शेतक-यांच्या हिताचे काम करणारी बँक असून जिल्हा बँकेच्या १२२ शाखेतून घरपोच पगार देण्याच्या बरोबरच ऊस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना सर्वाधीक पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतक-यांना या वर्षी साडेसतराशे कोटी रुपये बिन व्याजी कर्ज वाटप केले असून यावर्षी ९७ टक्के वसूली झाली आहे. यापुढे १०० टक्के कर्ज वसुली करण्याचे बँकेचे उदिष्ट आहे. जिल्हा बँकेने ९५ सभासदांना ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मंजूर केले. या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे. ग्राहक हे सर्वेच्च असून मागेल त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच आगामी काळात ग्राहकांना मोबाईलद्वारे कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होतील, असे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगीतले.

बँक कर्मचा-यांना व गट सचिवांना २२ टक्के बोनस व एक पगार
लातूर जिल्हा बँकेच्या कर्मचा-यांनी शेतक-यांसाठी सेवा देत असताना कोरोना काळात पगाराचे पैसे गावोगाव जाऊन वाटप केले. तर सोसायटीचा शेवटचा घटक म्हणजे गट सचिव होय. गट सचिवांच्या माध्यमातून कर्ज वितरण होते. त्यामुळे लातूर जिल्हा बँकेच्या कर्मचा-यांना व गट सचिवांना २२ टक्के बोनस व एक पगार देण्याचा निर्णय जिल्हा बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांनी घोषीत केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या