उदगीर : आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणा-या वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेने ९ जुलै रोजी नांदेड-पंढरपूर विशेष रेल्वेची फेरी मंजूर केली आहे. यामुळे वारक-यांसह प्रवाशांची सोय झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रक काढून कर्नाटक व महाराष्ट्रातील वारकरी व भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे सोडणार असल्याचे सूचित केले आहे.
नांदेड येथून रविवारी ९ जुलै रोजी गाडी (०७४९८) दुपारी ३ वाजता पंढरपूरकडे रवाना होईल. रात्री ८.२० वाजता लातूररोड, ८.५० वाजता उदगीर, १०.७ वाजता बिदर, गुलबर्गा, सोलापूर कुर्डुवाडी मार्गे सकाळी १०.३५ वाजता पंढरपूर ही गाडी पोहचेल. परतीच्या प्रवासात १० तारखेस रात्री ०७४९९ ही गाडी रात्री ९.३० वाजता पंढरपूरहून सुटेल. कुर्डुवाडी, सोलापूर, गुलबर्गा, बिदर मार्गे सकाळी १०.४० ला उदगीरला येईल व पुढे लातूररोड परळी, परभणी मार्गे नांदेडला सायंकाळी ५ वाजता पोहचेल.
कर्नाटक व महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक आषाढी एकादशीला वारीसाठी पंढरपूरला येत असतात. वारीसाठी येणा-या भाविकांना विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्याने सोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे. या रेल्वेसाठी खासदार भगवंत खुब्बा आणि उदगीरचे आमदार माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून रेल्वे संघर्ष समितीने पाठपुरावा केला होता.