32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरसुपर स्प्रेडरच्या कोरोना चाचण्यांना वेग

सुपर स्प्रेडरच्या कोरोना चाचण्यांना वेग

एकमत ऑनलाईन

लातूर : शहराच्या पश्चिम भागात तुलनेने अधिक रुग्ण आढळून येत असल्यामुळे लातूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहराचा पश्चिम भाग सुपर स्प्रेडर जाहीर करुन या भागात कोरोना चाचण्या घेण्यावर भर दिला आहे. दि. ६ मार्च रोजी या भागात १५८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एकाचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सुपर स्प्रेडरच्या कोरोना चाचण्या वेगाने करुन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिकचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी सांगीतले.

शहराच्या पश्चिम भागातील औसा रोड, बार्शी रोड, अंबाजोगाई रोड या भागातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत अधिक रुग्ण रुग्णालयात येत असल्याने महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहेत. या भागातील चार प्राथमिक आणि नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात ही मोहीम राबविली जात आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गाने अचानक उचल खाल्ली आहे. गेल्या आठवड्यातील दैनंदीन अहवालात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ ते ४० च्या आसपास होती. या आठवड्यात ती संख्या दुप्पट म्हणजेच ९० ते ९५ पर्यंत गेली. त्यामुळे सर्वच चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाच्या सूचनांनुसार विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कडक निर्बंध घालण्याचेही नियोजन केले जात आहे. शहराच्या पुर्व, दक्षिण व उत्तर भागाच्या तुलनेत पश्चिम भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने औसा रोड, बार्शी रोड व अंबाजोगाई रोड परिसरात घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचा सर्वे सुरु केला आहे. सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी आदी लक्षणांचे रुग्ण आहे का, याबाबतची माहिती संकलीत करुन त्यांची चाचणी चाचणी केंद्रांवर केली जात आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी औसा रोडवरील राजीव गांधी चौकातील भाजी मार्केट, या रोडवरील सर्वच सुपर मार्केट, हॉटेलस, लॉजेस, किराणा, भूसार दुकाने, दयानंद गेटवरील रयतु बाजार, ऑटोरिक्षा पॉइंटवरील ऑटोरिक्षा चालक यांच्या कोरोना चाचण्या केल्या. सुपर स्पे्रडरच्या कोरोना चाचण्या वेगाने पुर्ण केल्या जाणार आहेत.

या शिवाय सर्दी, खोकला, ताप असलेल्यांनी घराबाहेर पडू नये. कोणाच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन केले जात आहे. चाचणीचा अहवाल येईपर्यंत घरामध्येदेखील कुटूंबात इतर सदस्यांपासून विलगीकरणात राहावे. कमीत कमी संपर्क ठेवावा. महानरगरपालिकेच्या कोविड चाचणी केंद्रांवर चाचणी करुन घ्यावी, असेही आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात चार दिवसांत १२२ पॉझिटिव्ह
लातूर शहरात १ ते ४ मार्च या चार दिवसांत १२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या चार दिवसांत १७१ अँटिजेन, ६८७ आरटीपीसीआर अशा एकुण ९५८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्हचा दररोजचा आकडा हा २० ते ४५ च्या दरम्यान असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाची मुसंडी; १५० जण बाधीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या