लातूर : सोयाबीन केडीएस ७२६ या व इतर सोयाबीनच्या बियाण्यांची बोगसगिरी थांबवण्यासाठी जिल्हाभर सत्यता पडताळणी मोहीम राबवा व बियाण्याची बोगसगिरी थांबवा अन्यथा तोंडाला काळे लावून गाढवावरन धिंड काढणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथून विविध कंपन्यांकडून शेतक-यांना बोगस बियाणे दिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असंख्य शेतक-यांच्या बियाणे न उगवण्याच्या तक्रारी वाढून शेतक-यांचे नुकसान होत आहे. यास सर्वस्वी जवाबदार कृषी विभाग आहे. कृषी विभागाकडून बीजोत्पादन कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित होताना दिसत नाही. त्यामुळेच शेतक-यांकडून किंवा बाजारातून कमी भावाने सोयाबीन खरेदी करायचे त्याची चाळणी वगैरे करून आकर्षक पैकींग करून दुप्पट भावात बियाणे म्हणून विकायचे असा एककलमी कार्यक्रम राबवून कंपन्या नफा कमावण्याचे काम करत आहेत. हे सर्व माहिती असूनही कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम कृषी विभागाकडून केले जात असल्याने त्याचा मलिदाही कृषी विभागाला मिळतो हे वास्तव आहे. यात पिळवला जातो तो फक्त शेतकरी.बीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत बियाण्यासाठी शेतकरीनिहाय नोंदणी क्षेत्र किती आहे. कोणत्या शेतक-याकडे व किती उत्पादन झाले हे पाहिले पाहिजे. तसेच स्तोत्र बियाण्यांची खरेदी बिले व त्याचा मुक्तता अहवाल तसेच ब्रीडर सीड सोर्स याची नियमित पाहणी करणे गरजेचे आहे.
यात सर्वात महत्वाचे बीज प्रक्रिया केंद्र सुरू करण्यापूर्वी प्राप्त बियाणे साठयाची पडताळणी करणे गरजेचे असतानाही त्याची निरीक्षकामार्फत तपासणीच केली जात नाही. तसेच बियाणे कंपनीमार्फत बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणीकृत कार्यक्रमाचे माहिती तसेच सत्यप्रत बियाणे उत्पादन कार्यक्रमाची माहिती कृषी विभागाने निर्धारित केलेल्या स्टेटमेंट-१ व स्टेटमेंट-१ मध्ये अचूकपणे दिली पाहिजे. या सर्व बाबतीत कृषी विभाग बेपरवाईने वागतो आणि त्यामुळेच शेतक-यांच्या माथी बोगस बियाने मारले जातात. यात यशोदा सिड्स, महागुजरात सिड्स, ओस्वाल सिड्स, बूस्टर सिड्स, कल्पवृक्ष सिड्स, रेणाई सिड्स या कंपन्या अग्रस्थानी आहेत.या कंपन्यांच्या विरोधात शेतक-यांनी तक्रारी केल्या तरी आम्ही कृषी विभागाला मॅनेज करून हे सर्व करतोत. त्यामुळे आमचे कोणी वाकडे करू शकत नाही, अशा पद्धतीने वागतात त्यांच्या विरोधात तक्रार झाली तरी मॅनेजमेंट करून या कंपन्या सही सलामत सुटतात असा इतिहास आहे परंतु आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोगस बियाण्यांचे हे प्रकार खपवून घेणार नाही. येथून पुढे सर्व प्रकारच्या तपासण्या करून जर बियाणे बाजारात नाही आले किंवा प्राप्त बियाणे साठयापेक्षा जास्त बियाणे एखाद्या कंपनीने मार्केट मध्ये आणले तर यास कृषी विभागास दोषी धरून संबंधित अधिका-यांची तोंडाला काळे लावून गाढवावर बसून धिंड काढली जाईल, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी दिला.