19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरराज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ लातूर कडकडीत बंद

राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ लातूर कडकडीत बंद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमींनी शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या लातूर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. बंदकालावधीत शाळा- महाविद्यालये दुकाने प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.

सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन बंदला दुचाकी रॅलीने सुरुवात झाली. यावेळी शिवप्रेमींनी नागरीक व व्यापा-यांनी बंदमागची पार्श्वभूमी सांगत बंदला प्रतिसाद देण्याची व सामिल होण्याची विनंती केली छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, दयानंद गेट, पीव्हीआर चौक, पु. अहिल्यादेवी होळकर चौक, महात्मा गांधी चौक, सुभाष चौक, गंजगोलाई, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक विवेकांनद चौक, गुळमार्केट, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक व तहसील कार्यालय असा रॅलीचा मार्ग होता. काहीच्या हाती भगवे झेंडे तर काहींच्या हाती कोश्यारी यांच्या निषेधाचे फलक होते. जीजाऊ शिवरायांचा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करीत रॅलीने शहरातील मुख्य मार्ग व चौक पिंजून काढले.

छत्रपती शिवरायांचा विचार हा सदासर्वदा विश्व्यापी व विश्ववंद्य आहे. जगाने त्यांच्या कार्याची व शोर्याची थोरवी गायली आहे. तथापि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवराय व अन्य महापुरुषांबाबत सातत्याने अवमानकारक विधाने करीत आहेत यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून त्यांच्या अशा वर्तनाने राज्यपालपदाचीही प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन तात्काळ हटवावे, अशी मागणी निवेदनातून राष्ट्रपतींना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधानपरिषदेत कोश्यारी यांच्याविरुध्द निंदाजनक ठराव मांडून व तो मंजूर करुन केंद्रशासनाकडे पाठवावा व राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी अन्यथा शिवप्रेमी कोणत्याही मंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.

कोश्यारींना हटवा, दिल्लीला पाठवा
दुपारी १ वाजता रॅलीचा तहसिल कार्यालयासमोर समारोप झाला तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त करीत राज्यपाल कोश्यारींना तात्काळ राज्यपाल पदावरुन हटवण्याची जोरदार मागणी केली व त्यांच्या निषेधार्थ घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. कोश्यारींना हटवा, दिल्लीला पाठवा, अशी घोषणा देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांच्या नावे तहलिदारांना निवेदन सादर करण्यात आले.

बाजार समितीत सौदाच निघाला नाही
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या निषेधार्थ आयोजित लातूर बंदमध्ये लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितील सर्व आडते, व्यापारी सहभागी झाले होते. त्यामुळे बाजार समितीचा सौदाच निधाला नाही. शेतक-यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतल्याने एकही शेतक-यांनी आपला शेतमाल आडत बाजारात आणला नाही. परिणामी सर्व व्यवहार शंभर टक्के बंद राहिल्याने बाजार समितीची एका दिवसाची साधारणत: १० ते ११ कोटीची उलाढाल ठप्प राहिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या