लातूर : प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या उन्हाळी परीक्षेत येथील विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन या तीन शाखांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे तीन्ही क्रमांक तर इलेक्ट्रीकल तसेच संगणक या शाखांमधील द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादन केले आहे. एकाच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जवळपास सर्वच शाखांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावण्याची ही पहिलीच वेळ असून महाविद्यलायाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत मेकॅनिकल शाखेत विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विवेक टेळे यांने विद्यापीठात प्रथम, महेश शिंदे द्वितीय तर अमर गडदे याने तृतीय क्रमांक पटकावला. सिव्हील अभियांत्रिकी शाखेत मानसी हंडे विद्यापीठात प्रथम, पुजा बुलबुले द्वितीय तर हणमंत गवळी तृतीय आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेत सोनाली देवकते प्रथम, पे्रमा चव्हाण द्वितीय तर शीतल सोनवळे तृतीय आली आहे. इलेक्ट्रीकल अभियांंत्रिकी शाखेत याच महाविद्यालयाची पुजा गोरे द्वितीय, शुभांगी वाघमारे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. संगणक अभियांंत्रिकी शाखेत शुभम याचे हा विद्यार्थी द्वितीय आला आहे. विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी मिळवलेल्या यशाचे विद्यापीठस्तरावर कौतूक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष अमित विलासराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन बुके, सर्व विभाग प्रमुख व कर्मचा-यांनी अभिनंदन केले.