औसा : प्रतिनिधी
बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता दि ३१ मे रोजी झाली. यावेळी कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, सरव्यवस्थापक दत्ता शिंदे, संचालक शाम साळुंखे,सुरेश पवार, हणमंत माळी, प्रदीप चव्हाण, सचिन पाटील, विलास पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी व ऊसवाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
गेली सलग आठ वर्ष बंद असलेला हा कारखाना राज्य शासनाने घेतलेल्या थकहमी व माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे यावर्षी सुरू झाला, कारखान्याने यंदा जवळपास १८५ दिवसाच्या आपल्या हंगामात सभासद व बिगर सभासद ऊस उत्पादक शेतक-यांच्या दोन लाख ८ हजार ९५३ मे. टन ऊसाचे गाळप करीत अंदाजे दोन लाख १४ हजार किं्वटल साखरेचे उत्पादन केले असून गाळप केलेल्या ऊसाचे बिल अंदाजे ४६ कोटी रुपये शेतक-याच्या खात्यावर प्रति टन २२०० च्या दराने जमा केल्याचे चेअरमन बाजुळगे यांनी सांगितले.
यावर्षी कारखान्याचा हंगाम २८ नोव्हेंबरला सुरू झाला असला तरी नैसर्गिक आपत्ती मुळे डिसेंबर च्या मध्यात प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरुवात झाली होती . कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेली थकहमीची देखील कारखान्याने परतफेड केली असून कारखान्याची गाळप क्षमता इतर कारखान्याच्या तुलनेत कमी असल्याने यंदा मोठ्या अडचणी आल्या असल्या तरी पुढील वर्षी होणा-या हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येणार असून त्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.. यावेळी ऊस पुरवठादार शेतकरी, वाहतूक ठेकेदार, तोडणी मजूर, कामगार यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला.