रेणापूर : रेणापूर तालुक्यामधील आनंदवाडी व परिसरात सततच्या पावसामुळे आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह अन्य पिकांची पाहणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी पाहणी केली. शेतकरी बांधवांना धीर देत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू, असा दिलासाही त्यांनी शेतक-यांना यावेळी दिला.
सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पिके पिवळी पडली आहेत. तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नाही ते कुजले आहे. अनेक भागांत गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला आहे व तो दिवसेंदिवस जाणवत आहे. पिकांच्या झालेल्या या नुकसानीचे पंचनामे तातडीने होत नसल्याने बहुसंख्य शेतकरी बांधव दुबार-तिबार पेरणी करावी की नाही, या विवंचनेत आहेत. तेव्हा प्रशासनाने लवकर पंचनामे करणे आवश्यक आहे, याकडे अधिका-यांचे लक्ष वेधले.
यावेळी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, तालुका कृषी अधिकारी एच. एम. नागरगोजे, कृषी सहाय्यक एस. व्ही. कदम, कृषी पर्यवेक्षक एस. जी. वाघमारे, मंडळ कृषी अधिकारी के. जी. सुरवसे, तलाठी अमोल काळे तसेच, ट्वेंटीवन कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, गोंिवद पाटील, विश्वासराव देशमुख, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रेणा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, विश्वनाथ कागले, मतीन अली सय्यद आदी उपस्थित होते.
शेतक-यांच्या डोळ्यात पाणी
रेणापूर तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागाची आमदार धिरज देशमुख यांनी आज पाहणी केली. तेव्हा शेतकरी पंडित बांडे, शेतकरी बब्रुवान नारायण टमके यांनी आपल्या शेतात सकाळपासून वेचलेल्या गोगलगायी दाखविल्या. अर्ध्या एकरमध्ये टोपलीभर गोगलगायी जमा होत आहेत. त्या वेचल्या तरी दिवसेंदिवस गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचेही काही शेतक-यांनी सांगितले. अद्याप नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, अशी व्यथा मांडताना शेतक-यांचे डोळे पानावले होते. त्यांच्याशी संवाद साधून आमदार धिरज देशमुख यांनी त्यांना धीर दिला.