औसा (संजय सगरे ) : प्रस्तावित लातूर ते गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाबाबत सर्व्हे करण्यासाठी रेल्वेच्या अधिका-यांची टिम नुकतीच लातूर, निलंगा व उमरगा तालुक्यात आली परंतु या अधिका-यांना औशाचे आमदार औसा येथे आपल्या कार्यालयात बोलावून हा प्रस्तावित मार्ग औसा शहर व परिसरातून गेल्यास होणारे फायदे व रेल्वे विभागाची होणारी खर्चाची बचत याची माहिती त्यांना दिली. यानिमित्ताने मात्र आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
तत्कालीन रेल्वे मंत्री व गुलबर्गाचे खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी लातूर- औसा-उमरगा – आळंद – गुलबर्गा या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा सर्वे करण्यात यावा असे आदेशित केले होते.
औशाचे तत्कालीन आमदार बसवराज पाटील यांनी याकामी खरगे यांच्याकडे पाठपुरावा केला होता तर शिवसेनेचे खासदार प्रा.रवींंद्र गायकवाड यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करुन या रेल्वे मार्गाची आवश्यकता स्पष्ट केली होती. केंद्रातील सत्ताबदलामुळे हा प्रस्तावित रेल्वे मार्गाचा सर्व्हे रखडला होता परंतु लातूरचे तत्कालीन पालकमंत्री निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे पाठपुरावा करुन हा रेल्वे मार्ग लातूर-औसा-उमरगा ऐवजी लातूर रोड ते निलंगा मार्गे उमरगा- गुलबर्गा याप्रकारे असावा असा आग्रह धरला व तसा सर्व्हे करण्याबाबतची कार्यवाही दि २३ नोव्हेंबरपासून सुरु केली आहे परंतु औसेकरांची हक्काची रेल्वे निलंगेकर पळवीत असल्याची भावना औसेकरांमध्ये निर्माण झाली आहे.
तालुक्यातील ‘राजकीय अनागोंदी’ व स्थानिक नेतृत्वाचा वानवा यामुळे रेल्वे मार्गाबाबत फक्त समाजमाध्यम ,व प्रसिध्दीमाध्यमातच हा विषय रंगत आहे.नगराध्यक्ष अफसर शेख व आमदार पवार यांनी या प्रकरणी लक्ष घातले आहे .नगराध्यक्ष अफसर शेख यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना पत्राद्वारे हा रेल्वेमार्ग औसा शहारापासून जावा अशी मागणी केली आहे. आ.मदार अभिमन्यू पवार यांनी रेल्वेच्या त्या अधिका-यांना चक्क औसा येथील आपल्या कार्यालयात बोलावून कार्यकर्त्यासमोर अधिका-यांशी चर्चा केली व औसा हा मार्ग कसा फायदेशीर आहे हे स्पष्ट केले आणि आपण प्रामाणिकपणे करीत असलेल्या प्रयत्नाची चूणूक दाखवून दिली आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी अभिमन्यू पवार यांच्या विनंती वरुन औशाला रेल्वे कोच फॅक्टरीची तत्वत: मान्यता दिली होती.
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीची निर्मिती ही केवळ अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नामुळेच झाली आहे. हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारुशकत नाही. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी असणा-या स्रेहसंबंधाचा उपयोग आमदार पवार हे औसा मतदारसंघ विशेषत: औसा तालुक्यासाठी करतील, अशी खात्री कार्यकर्ते देत आहेत .त्यामुळे आमदार पवार यांना आपले नेतृत्व सिध्द करण्याची ही संधी चालून आली आहे. दि. २५ नोव्हेंबर रोजी औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांच्या शहर कार्यालयाला गुलबर्गा या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाच्या सर्व्हेशनसाठी लातूर जिल्ह्यात आलेले समूह प्रमुख उपमुख्य प्रबंधक सुरेश जैन, रवी गुजराल, वाहतूक निरीक्षक मुकेश लाल, रेल्वे अभियंता वी.पी.चौधरी यांनी भेट दिली.
यांच्याशी आमदार पवार यांनी लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा केली. यावेळी आमदार पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी झालेल्या चर्चेत लातूर-औसा- लामजना- किल्लारी – उमरगा – आळंद – गुलबर्गा हा मार्ग सरळ आहे. मार्ग सरळ असल्याने अंतरही कमी आहे म्हणजे प्रवाशांच्या वेळेची आणि इंधन खर्चाची दररोज बचत होईल. अंतर कमी असल्याने भूसंपादनापासून रेल्वेमार्ग निर्मितीपर्यंतचा खर्चही कमी असेल आणि मालवाहतूक खर्चही कमी येईल ज्याचा नियमित फायदा शेतक-यांना आणि उद्योगांना होईल आदी बाबींवर आमदार अभिमन्यू पवार व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. सुरुवातीच्या आणि दैनंदिन कमी खर्चात अधिक नागरिकांना सेवा देता येईल अशा पद्धतीने हा मार्ग जावा अशी भूमिका यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी संबंधित सर्वे प्रमुखांसमोर स्पष्ट केली.
यावेळी आलेल्या संबंधित रेल्वे समूह अधिका-यांचा सत्कार आमदार अभिमन्यू पवार यांनी केला. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, सुशील बाजपाई, अॅड मुक्तेश्वर वागदरे, अॅड. अरंिवंद कुलकर्णी, भाजपचे गटनेते सुनील उटगे, संतोष मुक्ता, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भिमाशंकर राचट्टे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय परसणे, शिवरुद्र मुरगे, अच्युत पाटील, विनोद जाधव आदी उपस्थित होते.
कमी खर्चात अधिक सेवा देण्याची भूमिका
रेल्वेसमोर २ मार्गांचे पर्याय उपलब्ध आहेत. या दोनपैकी कुठल्याही मार्गाने रेल्वे गेली तरी त्याचा फायदा लातूर जिल्ह्यालाच होणार आहे. त्यामुळे कुण्या मार्गाला माझाकिंवा इतर कुणाचा विरोध असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सुरुवातीच्या आणि दैनंदिन कमी खर्चात अधिक नागरिकांना सेवा देता येईल अशा पद्धतीने हा मार्ग जावा अशी भूमिका आमदार अभिमन्यू पवार रेल्वे सर्व्हेशन समुह अधिकारी यांच्यासमोर मांडली
मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू होणार !