शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील तळेगाव बोरी येथील ग्रामपंचायत इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. पावसात छत गळत असून त्यात स्लॅबचे तुकडे पडत असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत पूर्णपणे धोकादायक बनली असून कर्मचा-यांंना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याने नवीन ईमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरपंच हारूबाई ठोके व उपसरपंच आत्माराम एकोर्गे यांनी केली आहे.
ग्रामपंचायतच्या नवीन इमारत बांधकामासाठी गेली दोन वर्षांपासून प्रशासनाकडे ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समितीमार्फत तीन प्रस्ताव देऊन पाठपुरावा करीत आहे मात्र अद्यापही यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने नागरिकांचे दैनंदिन कामे करण्यासाठी अडचण निर्माण होत असून नवीन ईमारत बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान तालुक्यातील तळेगाव-बोरी येथे सुमारे ४० वर्षांपूर्वीची एक १५/१५ ची खोली बांधण्यात आली होती. त्यात अगोदर जिल्हा परिषद शाळा भरत होती. त्यानंतर या खोलीत ग्रामपंचायतींचा कारभार करण्यात येत आहे.अत्यंत जीर्ण झालेली
ही खोली भीज पावसात गळत असून स्लॅबचे तुकडेदेखील निखळून पडत आहेत. त्यामूळे या खोलीला पाडून नवीन इमारत बांधकाम करणे गरजेचे असल्याचे ग्रामसेवक पी.एस. शिरूरे यांनी सांगितले.
प्रस्तावाची माहिती घेऊन निधी उपलब्ध करून देऊ
तळेगाव बोरी ग्रामपंचायतीने नवीन इमारतीसाठी पं.स.मार्फत जिल्हा परिषदेकडे जो प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्याची माहिती घेऊन लवकरच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन ईमारत बांधकामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ
-अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. लातूर