\ लातूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाण पुलाच्या भूयारी मार्गावर तेल सांडल्याने रविवारी दुपारी सुमारे १० वाहने घसरुन किरकोळ अपघात झाले. दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचुन रस्ता धुवून काढला आणि वाहतूक सुरळीत सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाण पुलाच्या भूयारी मार्गावर झालेल्या अपघातात एका वाहनामधील तेलाचा कॅन रस्तावर पडला आणि संपूर्ण रस्त्यावर तेल पसरले.
भूयारी मार्गाने जाणारी सुमारे १० वाहणे घसरुन किरकोळ अपघात झाले. दरम्यान काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रविण सूर्यवंशी व मुन्वर शेख यांनी महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांना याबाबत भ्रमनध्वनीवरुन कळवले. किसवे यांनी अग्निशामक दलाच्या अधिका-यांशी संपर्क साधला आणि काही वेळेत अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. अग्निशामक दलाच्या जवानांनी या मार्गावरील वाहतूक बंद करुन तेल सांडलेला रस्ता धुवून काढला आणि अर्ध्या तासानंतर या मार्गावरुन वाहतूक सुरळीत सुरु झाली.