लातूर : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय एकाच विद्यापीठाशी सलग्न असताना एकच शिक्षण पध्दत कार्यान्वीत असताना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत राज्यातील विभागानुसार ७०:३० टक्याचे आरक्षणाचे धोरण हे असंवैधानिक आहे. वैद्यकीय शिक्षणात प्रवेश घेण्यासाठी असलेला ७०:३० टक्याचा फॉम्यूला रद्द करून गुणवत्तेनुसार एकच निवड यादी करुन प्रवेश द्यावा. तसेच मराठवाड्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मराठवाडा पालक संघाच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय हे केवळ एकाच विद्यापीठाशी संलग्नित असून देशपातळीवर एकच नीट परीक्षा घेतली जात. महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेशाकरीता पुर्ण गुणांनुसार एकच निवड यादी न लावता मराठवाडा, विदर्भ रेस्ट ऑफ महाराष्ट्र असे असंवैधानिक (७०:३० टक्के) आरक्षण लागू केले आहे. ७०:३० टक्के हे सुत्र देशातील इतर कुठल्याही राज्यात राबविले जात नसुन या सुत्रामुळे दरवर्षी मराठवाड्यातील किमान ६०० विद्यार्थी डॉक्टर बनण्यापासून वंचित राहत आहेत. ही बाब शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठवाडा विभागाच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.
विशेष म्हणजे एम.बी.बी.एस. ची प्रवेश प्रक्रिया ही सामाजिक तथा जातीनिहाय आरक्षणानुसार राबविली जात असतांना पुन्हा विभागनिहाय आरक्षण कशासाठी? ७०:३० टक्के सुत्रामुळे एम.बी.बी.एस. ला प्रवेश मिळविण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्याना नीट मध्ये पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील विद्यार्थ्याच्या तुलनेत जवळपास ४०-५० गुण अधिक घ्यावे लागतात ही बाब समानतेच्या तत्वाचा भंग करणारी आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षणात प्रवेश घेण्यासाठी असलेला ७०:३० टक्याचा फॉम्यूला रद्द करावा, अशी मागणी मराठवाडा पालक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर प्राचार्य डी. एन. केंद्रे (लातूर), डॉ. भारत घोडके (परळी), उध्दवराव देशमुख (परभणी), राजेभाऊ उंबरे (बीड), माधवराव कदम (माजलगाव), डॉ. नंदु कुलकर्णी (नांदेड), सुदाम शिंदे (परळी) यांच्या स्वाक्ष-या आहेत.
गुणवत्ता असून देखील मराठवाडयातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित
मराठवाड्यात शासकीय व खाजगी असे ६ वैद्यकीय महाविद्यालय असून त्यात एकूण ९०० जागा आहेत. तर उर्वरीत महाराष्ट्रात शासकीय व खाजगी एकूण २६ वैद्यकीय महाविद्यालय असून त्यात एकूण ३ हजार ९५० जागा तर विदर्भात शासकीय व खाजगी एकूण ९ वैद्यकीय महाविद्यालय त्यात एकूण १ हजार ४५० जागा आहेत. त्यामुळे लागू असलेल्या ७०:३० टक्याच्या कोटयामुळे गुणवत्ता असून देखील मराठवाड्यातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहत आहेत.
स्पेशल जुगाड : बाइकमध्ये लपवल्या २० दारूच्या बाटल्या