18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरथंडीचे आगमन; ऊबदार कपडे खरेदीला आला वेग

थंडीचे आगमन; ऊबदार कपडे खरेदीला आला वेग

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत सध्या रात्रीच्या किमान तापमानात सरसरीच्या तुलनेत घट होऊन थंडीचे आगमन झाले आहे. त्यामुळे ऊबदार कपडे खरेदीला आता वेग आला आहे. लातूर जिल्ह्याचे रविवारचे कमाल तापमान २६ तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे दिवसभर गारवा होता. दरम्यान रविवार सुटीचा दिवस असल्याने स्वेटर मार्केटमध्ये ऊबदार कपडे खरेदीसाठी गर्दी झाली होती.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या आगमनासाठी ऑक्टोबरच्या शेवटाची वाट पाहावी लागली. लांबणा-या मोसमी पावसामुळे यंदा सलग तिस-या वर्षी ऑक्टोबर हिटचा कालवधी वातावरणीय प्रणालीतून गायब झाला आहे. गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढला आहे. परिणामी घरातील कपाटबंद ऊबदार कपडे बाहेर निघाले आहेत. तसेच नवीन ऊबदार कपडे खरेदीकडेही कल वाढला आहे. येथील महात्मा गांधी चौकातील जुने रेल्वे स्टेशनच्या गेटवर दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वेटर मार्केट सुरु झाले आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते फे ब्रुवारी या थंडीच्या कालावधीत स्वेटर मार्केट असते. स्वेटर मार्केटमध्ये या वर्षी १६ ते १७ दुकाने थाटली आहेत. यातील काही ऊबदार कपडे विक्रेते कर्नाटक, हिमाचल प्रदेश येथील आहेत. तर काही विक्रेते हे स्थानिक आहेत. शहरातीलच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवरही तिबेटीयन विक्रेत्यांनी स्वेटर मार्केट सुरु केले आहे.

या विक्रेत्यांकडे पंजाब, दिल्ली, लुधियाना येथील ऊबदार कपडे आहेत. लहान मुलांपासुन ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक असलेले ऊबदार कपडे या स्टॉलस्वर उपलब्ध आहेत. स्वेटर, स्कार्प, हातमोजे, पायमोजे, कानटोपी, शॉल, जॅकेट, महिलांचे स्वेटर विक्रीस उपलब्ध आहेत. लहान मुलांचे स्वेटर २०० ते २ हजार रुपयांपर्यंत, ज्येष्ठांचे स्वेटर ४०० ते १ हजार २०० रुपयांपर्यंत, जॅकेट ५०० ते २ हजार ३०० रुपयांपर्यंत, सााधे स्वेटर ३०० ते ७०० रुपये, लेडीज स्वेटर ४०० ते १००० रुपये, कानटोपी ५० ते १५० रुपयांपर्यंत, हातमोजे ८० ते २०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, अशी माहिती बाबा शेख यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या