22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरमेवापूर-अतनूर रस्त्यावरील पूल गेला तिस-यांदा वाहून

मेवापूर-अतनूर रस्त्यावरील पूल गेला तिस-यांदा वाहून

एकमत ऑनलाईन

जळकोट : जळकोट तालुक्यातील मेवापूर येथील नागरिकांच्या नशिबी आजही कच्चा पुलच आहे, ऑगस्ट २०२१ ते जुलै २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत अतनूर ते मेवापूर रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पूल तीनदा वाहून गेला आहे. प्रशासनाने देखील तीन वेळेस कच्चा फुल उभा केला परंतु प्रशासनाच्या अधिका-यांना मात्र या ठिकाणी पक्का पूल उभा करता आला नाही. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल, या नाल्यावर किती वेळा कच्चा पूल करणार असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

भारत देश जागतिक महासत्ता बनत असल्याचे सांगितले जात आहे परंतु तीन वेळेस पुल वाहून गेल्यानंतरही या ठिकाणी पक्का पूल उभा करता येत नसेल तर यास काय म्हणावे असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे. जळकोट तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या मेवापूर गावाजवळ एक छोटासा नाला आहे. जेव्हा जोराचा पाऊस होईल तेव्हा या नाल्यातून अतिशय वेगाने पाणी वाहते . जळकोट तालुक्यात मध्ये दि १७ ऑगस्ट २०२१ रोजी जोरदार पाऊस झाला. या दिवशी मेवापूर ते आतनूर या दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेला. दुस-या दिवशी दैनिक एकमत ने गावक-यांची अडचण लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाचे अधिका-यांंनी तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने दि २६ऑगस्ट रोजी पाईप टाकून तात्पुरता पूल बनवला.

हा पूल बनवून फक्त वीस दिवस झाले होते यानंतर दि २१ सप्टेंबर रोजी १२२ मिलिमीटर पाऊस दोन तासांमध्ये झाला. पुन्हा हा पूल वाहून गेला. यानंतर ग्रामपंचायत तसेच अधिका-यांंनी मिळून पुन्हा एकदा कच्चा पूल तयार केला . आजपर्यंत हे नागरिक या कच्च्या पुलावरूनच ये-जा करीत होते. पुन्हा एकदा या पावसाळ्यात १४ जुलै रोजी हा कच्चा पुल वाहून गेला. त्यानंतर तब्बल दहा दिवसांनी या ठिकाणी परत दुसरीकडून पाईप आणून या नाल्यावर टाकून गावक-यांच्या सोयीसाठी तहसीलदार सुरेखा स्वामी, तसेच शाखा अभियंता शेख यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी एका सामाजिक संस्थेमार्फत हा कच्चा पुल तयार केला. सध्या हा पूल तयार झाल्यामुळे गावक-यांची सोय झाली असली तरी येणा-या काळात आणखीन मोठा पाऊस झाला तर पुन्हा एकदा हा पुल वाहून जाणार आहे.

पक्का पूल बनविण्यासाठी प्रयत्न करावेत
नेवापूर येथील ग्रामस्थांनी तसेच अनेक राजकीय पक्षांच्या पुढा-यांनी मेवापूर ते अतनूर जोडणा-या रस्त्यावर पक्का पुल करावा, अशी मागणी केली होती तसेच अनेक प्रसारमाध्यमांनीही मागणी लावून धरली होती परंतु या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. पूर्ण उन्हाळा गेला परंतु या ठिकाणी अधिका-यांंनी पक्का पूल उभा करण्याचे काम केले नाही. एकाच ठिकाणचा पूल जर तीनदा वाहून जात असेल आणि या ठिकाणी जर पक्का पूल उभा करण्याची तसदी घेतली जात नसेल तर यास काय म्हणावे असा सवालही उपस्थित केला जात आहे. आता तरी निदान अधिका-यांनी याकडे विशेष लक्ष देऊन नवीन पूल उभारण्यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही आता होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या