लातूर : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा लग्न सोहळयातील जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची तज्ज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. या अहवालातून मिळालेली माहिती इतर ठिकाणी पून्हा असा प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी म्हंटले आहे.
निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथे विवाह सोहळयास उपस्थित असलेल्या २०० हून अधिक व-हाडींना २२ मे रोजी दुपारी जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडलीहोती. या सर्वावर देवणी तालुक्यातील वलांडी येथे प्रा. आरोग्य केंद्र, निलंगा उपजिल्हा रुग्णालय, जवळगा उपकेंद्र, अंबुलगा बु. या ठिकाणी उपचार करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती उत्तम असून बहूतांशी रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत.
सदरील घटनेची माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांना कळाली तेव्हा त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परीषद, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना तातडीने संपर्क करुन सर्व रुग्णांची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांना स्वत: लक्ष देऊन उपचार यंत्रणा राबवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यासोबतच लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अभय सांळुके यांना रुग्णालयात भेट देऊन रुग्णाची माहिती घ्यावी, नातेवाईकांना धीर द्यावा, अशा सुचनाही दिल्या होत्या.
पालकमंत्री देशमुख यांच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांनी सर्व रुग्णांची वर्गवारी करुन त्यांना गरजे प्रमाणे वेगवेगळया रुग्णालयात पाठवून उपचार केले. जिल्हा नियोजन समिती सदस्य अभय सांळुके व तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या प्रकृतीची व रुग्णावर केल्या जाणा-या उपचारांची माहिती घेतली आणि नातेवाईकांना धीर दिला. एकुण घटनाक्रमाची माहिती त्यांनी पालकमंत्री देशमुख यांना दिली.
जिल्ह्यातील यंत्रणेने आपातकालीन परीस्थिती योग्य पध्दतीने हाताळल्याबद्दल पालकमंत्री देशमुख यांनी समाधान वयक्त केले आहे. सदरील घटनेची विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचीकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांची त्रीसदस्यीय समिती नेमूण सखोल चौकशी करावी व अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. हा अहवाल भविष्यात इतर ठिकाणी अशा घटना घडू नयेत म्हणून मार्गदर्शक ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.