33.3 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home लातूर मांजरा कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबाबत विचार करावा

मांजरा कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबाबत विचार करावा

एकमत ऑनलाईन

विलासनगर : कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णावर उपचार करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. ऑक्सीजन चा प्रकल्प उभारण्यासाठी वीज अत्यंत महत्त्वाची असून मांजरा परिवार चांगले वीज उत्पादन करत आहे. त्यामुळे यापुढील काळात मांजरा परिवाराने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबाबत विचार करावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.

विलासनगर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या आधीमंडळाच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख होते. तर आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे यांच्यासह सर्जेराव मोरे व विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की मांजरा कारखान्याच्या परिसरात आल्यानंतर आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मांजरा परिवार अत्यंत सक्षमपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाटचाल करत आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत कमी किमतीमध्ये उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प मांजरा कारखान्यांनी उभा केलेला आहे. हे इथेनॉल कंपन्यांना पाठवून त्यापासून दर पंधरा दिवसाला मांजरा कारखान्याला पैसे मिळतात. तर या पुढील काळात मांजरा परिवाराने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबाबत सकारात्मक विचार करावा व आरोग्य विभागाला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्याची वाटचाल सहकार महर्षी दिलीपराव देशमुख नेतृत्वाखाली अत्यंत कार्यक्षमपणे सुरु असून कारखान्याचे व्यवस्थापन व आर्थिक नियोजन अत्यंत दर्जेदार असल्याने मांजरा परिवार सभासदाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची योग्य ती दक्षता घेऊन सभासदांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देत असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आर्थिक दृष्ट्या अत्यंत नियोजनबद्ध काम करत असल्याने बहन की आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यामुळे बँकाकडून साखर कारखान्यांना योग्य दराने कर्ज उपलब्ध होत असल्याने कारखान्याकडून सभासदांना वेळोवेळी चांगल्या सुविधा देणे शक्य झाले आहे.

सहकारी बँक व कारखाने परस्परांच्या सहकार्याने सुस्थितीत असल्याने विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मांजरा कारखान्याला राज्य व देश पातळीवरील पन्नासपेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहे परंतु यापुढील काळात या परिवारात काम करणा-या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी अत्यंत कार्यक्षमपणे काम करुन अधिकारी व कर्मचारी वर्गाला आहे ही उत्कृष्ट पणे काम केल्याचे पुरस्कार मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे व त्यातूनच कारखान्याचा ही अधिक गतीने विकास होण्यास मदत होईल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात येणार असून लातूर शहराबरोबरच अवसा रेणापुर, उदगीर, निलंगा येथे औद्योगिक वसाहती निर्माण करुन या भागात उद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगून राज्यातील २-३ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे व आपल्या जिल्ह्याला कोरोना पासून दूर ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी ही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. तत्पूर्वी मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक रणवरे यांनी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला. तसेच आजच्या सर्वसाधारण सभेसमोर १८ विषय ठेवले. या सर्व विषयांना सर्वसाधारण सभेने मान्यता प्रदान केली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन सर्वसाधारण सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली.

उजनीचे पाणी लातूरला आणण्याबाबत मंत्रिमंडळात विषय मांडला जाणार
उजनी धरणाचे पाणी धनेगावमार्गे लातूर शहराला आणले जाणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री देशमुख यांनी देऊन नुकत्याच औरंगाबाद येथे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत लातूर जिल्हा नियोजन समितीला २७५ कोटीचा भरीव निधी मंजूर करुन घेतला व या निधीतून लातूर जिल्ह्यात विविध विकास कामे अधिक गतीने मार्गी लागणार आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मांजरा परिवाराने विश्वासाचा व स्नेहाचा वेगळा पॅटर्न निर्माण केलेला
मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, कोणत्याही सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा ही अत्यंत सुप्रीम सभा असते. त्यामुळे या सभेस शेतकरी सभासदांनी उपस्थित राहणे अत्यंत महत्वाचे असते. या सभेत कारखान्याच्या संचालक मंडळाने वर्षभरात केलेल्या कामांना व पुढील वर्षभरात राबविण्यात येणा-या उपक्रमांना मान्यता देण्यात येत असते. मांजरा परिवाराने विश्वासाचा व स्नेहाचा वेगळा पॅटर्न निर्माण केलेला असून या परिवारातील सभासदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मांजरा परिवाराकडून शेतक-यांच्या हातात कशा पद्धतीने दोन पैसे अधिक मिळतील याचा विचार नेहमी केला जातो असे त्यांनी सांगितले. तसेच राज्य शासन शेतकरी सभासदांना बिनव्याजी तीन लाखापर्यंतचे कर्ज देणार असेल तर लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक हे त्याच्या पुढे एक पाऊल टाकून जिल्ह्यातील शेतक-यांना चार लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिलीपराव देशमुख यांनी दिली. तसेच मांजरा कारखाना कडून शेतक-यांना उसाचा पहिला हप्ता बावीसशे रुपये दिलेला असून हा कारखाना शेतक-यांच्या उसाला मराठवाड्यातील सर्वात अधिक दर देणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

बामणी येथे मारहाणीत एकाचा खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या