लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या सार्वत्रिक निवडणुकीत फील्डमध्ये जावून कार्य करत पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे उत्कृष्ठ संघटक असलेले माझे सहकारी एस. आर. देशमुख यांच्या निधनाची बातमी कळाली विश्वासच बसेना. विकासरत्न विलासराव देशमुख व त्या कुटुंबासोबत गेली ४५ वर्ष राजकारण, समाजकारण कार्य करत असलेले लातूरचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस. आर. देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे खुप मोठे नुकसान झाले असून हे नुकसान कधीही भरून येऊ शकणार नाही. एक चांगल्या संघटकाला आपन मुकलो आहेत, अशा शब्दात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एस. आर. देशमुख म्हणजे चालते, बोलते लोकांचे प्रश्न समजुन घेवून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे कुशल संघटक म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी कार्य करीत असताना त्या संस्थेला न्याय देण्याचे काम केले. त्यांनी ज्या जवाबदारी घेतल्या त्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने लोकांत मिसळून काम करायचे. जिल्हा बँक, नगर परिषद क्षेत्रात अध्यक्ष असताना शहरातील विकासकामे मार्गी लावले. त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस पक्षाचे खुप नुकसान झाले आहे. त्याच बरोबर देशमुख कुटुंबातील सदस्य गमावल्याने खुप दु:ख झाले आहे त्यांच्या दु:खात देशमुख कुटुंब सहभागी आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असेही माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले.
एस. आर. देशमुख यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष आणि सामाजिक क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान
४लातूरचे माजी नगराध्यक्ष, लातूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. आर. देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष आणि सामाजिक क्षेत्राचे न भरुन निघणारे नूकसान झाले, अशी भावना राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतीक कार्य मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, एस. आर. देशमुख यांच्या जाण्याने देशमुख कुटुंबीयांनी आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा खंदा समर्थक, काँग्रेस पक्षाचा पाईक अशी त्यांची ओळख होती,ते माझे जिवलग होते. त्यामुळे माझ्यासाठी ही अतिशय दु:खद बातमी आहे. लातूरचे नगराध्यक्ष म्हणून शहराच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान राहिले आहे, लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून तसेच इतर विविध सहकारी, सामाजिक संस्थानचे पदाधिकारी म्हणून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहणारे आहे, एकंदरीत त्यांच्या जाण्याने न भरून निघणार नुकसान झालेले आहे . असे त्यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे. गणेश देशमुख आणि संपूर्ण देशमुख कुटुंबीय यांच्या दु:खामध्ये मी आणि देशमुख परिवार सहभागी आहे, अशी भावना व्यक्त करुन एस. आर. देशमुख यांच्या आत्म्यास शांती लाभो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी अशी प्रार्थना या शोकसंदेशात शेवटी त्यांनी केली आहे.
सच्चा मित्र हरपला
एस. आर. देशमुख यांच्या निधनाने एक सच्चा मित्र हरपला आहे. काँग्रेस पक्षात गेली ३५-४० वर्षे आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले. अगदी सामन्य माणसाच्या सुखदु:खात सहभागी होणारे काका आज आपल्यात नाहीत याचे तीव्र दु:ख होत आहे. पक्षाच्या कामात काका स्वत:ला झोकुन देत असत. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न जाणुन घेऊन ते नेत्यांच्या समोर मांडून त्या प्रश्नाची तड लावण्यात त्यांच्या हातखंडा होता. लातूर नगर परिषदेत अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य खुप मोठे आहे. एस. आर. देशमुख कुटूंबिय व आमचे कौटूंबिक नाते होते. त्यांचे आमच्यातून जाणे वेदनादायी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काँग्रेस पक्षाचे अपरिमीत नुकसान झाले
लातूरचे माजी नगराध्यक्ष एस. आर. देशमुख हे सर्वसामान्यांच्या हक्काचे व्यासपीठ होते. सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे हक्काने आपले प्रश्न मांडायचे आणि ते हक्काने सोडवुनही घ्यायचे. काका सर्वसामान्यांची नाळ ओळखणारे कार्यकर्ते होते. शहराच्या पश्चिम भागात त्याचे जसे नेटवर्क होते त्याही पेक्षा अधिक शहराच्या पुर्वभागात त्यांचे नेटवर्क होते. असंख्य नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क होता. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे अपरिमीत नुकसान झाले, अशा शब्दात लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.