18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeलातूरधनादेश न वठल्याने २३ कोटींच्या अपहाराचे फुटले बिंग

धनादेश न वठल्याने २३ कोटींच्या अपहाराचे फुटले बिंग

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखा शाखेतील रोखपाल तथा अव्वल कारकून मनोज फुलेबोयणे याने सात वर्षांच्या काळात जिल्हाधिका-यांच्या नावे असलेल्या बँक खात्यातून स्वत:सह भाऊ व अन्य दोघांच्या खात्यात सूमारे २२ कोटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपये वळती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बँक खात्यातून ९६ हजार ५५९ रुपये काढण्याबाबत धनादेश पाठविण्यात आला. मात्र, खात्यावर आवश्यक ती रक्कम नसल्याने तो धनादेश वठला नाही. त्यामुळे बँकेच्या खात्याचे स्टेटमेंट काढले असता २३ कोटी रुपयांच्या अपहाराचे बिंग फुटले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा विभागात महसूल सहायकाने केलेल्या तब्बल २३ कोटी रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार दि. २२ जानेवारी रोजी समोर आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना लातूरच्या न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तहसीलदार महेश मुकूंद परांडेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, महसूल विभागातील तत्कालीन लिपीक मनोज नागनाथ फुलेबोयणे याच्याकडे बँक खात्यांचा कारभार होता.

दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश देण्यात आला होता. जलसंधारण अधिका-यांना दोन धनादेश देण्यात आले होते. ज्याममध्ये १२,२७,२९७ आणि ४१,०६,६१० रुपये आरटीजीएसद्वारे वितरीत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शाखेत आरटीजीएस फार्म जमा करण्यात आले होते. मात्र खात्यात केवळ ९६ हजार ५५९ रुपये शिल्लक असल्याचे आढळून आले. लिपीक मनोज फुलेबोयणे याने दि. २६ मे २०१५ ते ८ जुन २०२२ या कालावधीत बनावट आरटीजीएस तयार करुन तहसीलदारांच्या स्वाक्षरीने धनादेशातील मूळ रकमेच्या आकड्यात स्वहस्ताक्षरात वाढ करुन ते आरटीजीस धनादेश स्वत:च्या, मित्राच्या बँक खात्यात जमा केले. २०१५ ते २०२२ या कालावधीत हा अपहार झाल्याचा प्राथमिक पोलीस तपास समोर आला आहे. तब्बल सात वर्षांंनंतर एवढ्या मोठ्या रकमेच्या अपहाराचा प्रकार समोर आला आहे. २९ मे २०१५ रोजी मनोज फुलेबोयणे हा जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा विभागात रुजू झाला. त्यानंतर ८ जून २०२२ रोजी त्याची औसा येथील तहसील कार्यालयात बदली झाली आहे.

 

आरोपींचा आकडा वाढण्याची शक्यता
२३ कोटींच्या अपहार प्रकरणी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात चारजणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दि. ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. असे असले तरी या अपहार प्रकरणातील तब्बल साडेतीन वर्षांच्या काळात बदली होऊन गेलेल्या व कार्यरत असे दोन तहसीलदार तथा आहरण व संवितरण अधिका-यांच्या (डीडीओ) स्वाक्षरीने व्यवहार झाल्याचे पुढे आले आहे. यामुळे या प्रकरणातील फिर्यादी तहसीलदार महेश परंडेकर यांनी या कोट्यावधींच्या अपहारात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरताील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग असल्याचा दाट संशय घेत त्यांचीही चौकशी करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या